अभिनेते मिलिंद सोमण २१ डिसेंबरला येणार कोल्हापुरात: देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 

कोल्हापूर : सध्या प्रदूषणाने माणसाचे आयुष्य अस्वस्थ बनले आहे. तसेच मनुष्याचे आरोग्य धोक्यात आले आहे याकरिता प्रदुषणमुक्त पृथ्वी आणि निरोगी स्वस्थ जीवनासाठी प्रदूषण टाळा असा संदेश देत प्रसिद्ध अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमण हे सायकलवरून देशातील विविध राज्यांचा दौरा करीत आहेत. या अंतर्गत बुधवार (२१ डिसेंबर) ला सकाळी ११.३० वाजता त्यांचे कोल्हापुरात आगमन होणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने हा उपक्रम होत असून, बुधवारी बँकेच्या वतीने मिलिंद सोमण यांचे तावडे हॉटेल परिसरात जंगी स्वागत होणार आहे. अशी माहिती बँकेचे क्षेत्रीय प्रमुख प्रशांत आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अभिनेते मिलिंद सोमण हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकलवरून कोल्हापुरात बुधवारी सकाळी ११.३० वाजता येतील. तावडे हॉटेलजवळ बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत करतील. त्यानंतर कोल्हापुरातील वीस ते पंचवीस सायकलस्वार सोमण यांच्यासोबत रॅलीत सहभागी होतील. सोमण हे बँक ऑफ बडोदाच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेमस्टोन बिल्डिंगमधील क्षेत्रीय कार्यालयाला भेट देतील. त्या ठिकाणी सोमण हे उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांशी संवाद साधतील. बँकेच्या ग्राहकांनी पेपरलेस वर्कसाठी बीओबी हे अॅप्लीकेशन जास्तीत जास्त वापरावे यासाठी ते प्रबोधन करतील. तसेच त्यांच्या हस्ते उपस्थितांना रोपवाटप केले जाईल. त्यानंतर ते बंगळूरला रवाना होतील. २५ डिसेंबरला स. ११.०० वाजता बंगळूरमध्ये त्यानंतर २६ डिसेंबरला स. ७.३० वाजता म्हैसूर शहरात आणि सायं. ४.३० वाजता मंगलोरला भेट देणार आहेत असे बँकेचे क्षेत्रीय विकास प्रबंधक मोहसीन शेख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला बँकेचे उपक्षेत्रीय प्रमुख देविदास पालवे, शिवाजी चौक शाखाप्रबंधक सचिन देशमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!