सारं काही होणार भव्य आणि दिव्य! सुमंगलम् लोकोत्सवात येणार भक्तांचा महापूर

 

कोल्हापूर: केंद्र आणि राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा रोजचा ताफा,  पंचवीस राज्यातून येणारे भक्तगण, पन्नास देशांचे परदेशी पाहुणे, हजारांवर साधूसंतांचा सहवास, पाचशेवर कुलगुरूंची उपस्थिती आणि दहा हजारावर व्यावसायिकांचे संमेलन… हे सारं पहायला आणि अनुभवण्यास मिळणार आहे ते कणेरी मठावरील तब्बल साडे सहाशे एकर जागेत. रोज पाच लाखांवर लोकांचा अपेक्षित महापूर आणि पर्यावरण जागरणासाठी प्रत्येकाचे पाऊल पडावे म्ह्णून राबविले जाणारे उपक्रम यामुळे हा लोकोत्सव केवळ भव्यदिव्यच नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे.
कणेरी मठावर पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचभूत लोकोत्सव होणार असून त्याची जय्यत तयारी सध्या मठावर सुरू आहे. यासाठी रोज शेकडो हात राबत आहेत. सात दिवस सात विविध विषयावर होणाऱ्या या महोत्सवात पर्यावरणपूरक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक उपक्रमांत लोकांचा सहभाग असावा यासाठी नियोजन सुरू आहे. या महोत्सवाला पंचवीस राज्यांतून रोज पाच ते सात लाखांवर लोक येण्याची शक्यता आहे. याशिवाय पन्नास देशातील परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहे.
देशातील तीनशेवर जिल्ह्यातून विविध संस्था व त्यांचे प्रतिनिधी येणार असल्याने संपूर्ण देशाच्या विविध भागांचे तेथे प्रतिनिधीत्व दिसणार आहे. देशभरातील पाचशेवर कुलगुरू येणार असल्याने त्यांच्या विद्वतेचा उपयोग निश्चितपणे होणार आहे. देशभरातून हजारावर साधुसंत येणार असल्याने या सर्वांचा सहवास भक्तांना मिळणार आहे. शेती हा भारताचा प्रमुख उद्योग आहे, यातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्ह्णून दीड हजारावर अवजारे, उत्पादने यांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
ऊर्जा आणि भक्ती यांचा मिलाफ या महोत्सवात पहायला मिळणार आहे, पण त्या पलीकडे व्यवसायिक घडण्यासाठी मदत होणार आहे. व्यवसायवृध्दीसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.  शंभरावर महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्टॉलची सोय करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रम आणि उपक्रमासाठी एक लाख, दोन लाख स्क्वेअर फुटाचे मंडप उभारण्यात आले आहेत. तीन लाख स्क्वेअर फुट जागेत थ्रीडी मॉडेल्यसची मांडणी करण्यात आली आहे.
पंचमहाभुतांचे सर्व पाच तत्वांसह आरोग्य आणि रिसायकलिंग विषयावर गॅलरी उभारण्यात आली आहे. येथे येणाऱ्या लोकांना शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, व्यवसाय यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!