
कोल्हापूर:पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवास आज सहाव्या दिवशी बारा लाख लोकांनी भेट दिली. प्रचंड गर्दीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात लोकोत्सवाचा सहावा दिवस पार पडला.
२६ फेब्रुवारी पर्यंत सिद्धगिरी कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात पर्यावरण जागृती, व्यापार उद्योगाची वृध्दी, सेंद्रिय शेतीचा प्रसार यासह नव्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी रोज दोन सत्रात अनेक मान्यवरांचा मुक्त संवाद होणार आहे. सेंद्रिय शेती कशी करावी, नवनवे स्टार्ट अप कोणते आहेत, व्यवसाय सुरू करताना काय काळजी घ्यावी, पर्यावरणपूरक उद्योग कोणते आहेत, आधुनिक पद्धतीने शेती, उद्योग आणि व्यवसाय करत उत्पादन खर्च कमी कसा करावा, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी कोणती जीवनशैली स्वीकारावी, आरोग्यसंपन्न कसे रहावे यासह अनेक गोष्टींचे मार्गदर्शन येथे केले जाणार आहे. प्रेरणादायी व्यक्तीनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी, त्याचा उपस्थितांना लाभ व्हावा यासाठी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी अधिक प्रयत्न करत आहेत. देशभरातील अशा व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधून निमंत्रित केले आहे.
या लोकोत्सवात हजारावर साधुसंताचा सहवास लाभला. पाचशे कुलगुरू शिक्षण क्षेत्रातील नव्या संशोधनावर प्रकाश टाकतील. दहा हजारावर उद्योजक आपल्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा मांडतील. चार हजारावर वैदूनी औषधी वनस्पतींची माहिती दिली. जगभरातून येणारे परदेशी पाहुणेही प्रगतीचा मार्ग दाखविणार आहेत.
Leave a Reply