
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या संदर्भात प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील विविध प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर येथील जाऊळाचा गणपती चौक याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक आणि नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक समस्या संदर्भात आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल रेखावार यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जाउळाचा गणपती चौक या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याचा सूचना बैठकीत आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी केल्या.त्यासाठी आवश्यक आराखडा तयार करा अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.कोल्हापूर शहरातील पार्वती टॉकीज परिसर, बागल चौक आणि विद्यापीठ रोड या मार्गावर असणारे व्यावसायिक आणि ग्राहकाच्या वाहनांच्या पार्किंगबाबत नियोजन करा. सेफ सिटी अंतर्गत कोल्हापूर शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद असल्याने हे कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत तसेच तपोवन परिसर, वसंत विश्वास पार्क याठिकाणी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि कोल्हापूर शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवा अशा सूचनाही आमदार पाटील आणि आमदार जाधव यांनी या बैठकीत केल्या.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वाहतूक कोंडी संदर्भात तातडीने कार्यवाही करू, याशिवाय येत्या पंधरा दिवसांमध्ये या संदर्भात संबंधित यंत्रणांनी बैठक घेण्याचे आश्वासित केले. तर भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्याकरिता, येत्या सहा महिन्यांमध्ये आठ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीला वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ विजय पाटील, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे , बाजार समिती संचालक सुयोग वाडकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply