
कोल्हापूर : महानगरपालिकेने अपुरा पाणीपुरवठा आणि कचरा उठाव हे नागरिकांचे दोन महत्वाचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत. अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांसोबत जनआंदोलन पुकारू असा इशारा आमदार जयश्री जाधव यांनी आज दिला.महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार शहरातील महिलांनी आ. जयश्री जाधव यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज आ. जयश्री जाधव यांनी आपल्या मंगळवार पेठ येथील जनसंपर्क कार्यालयात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांना हा इशारा दिला. या बैठकीत आ.जयश्री जाधव यांनी शहरात होणारा अपुरा पाणीपुरवठा, कचरा उठाव, डेंग्यू आजारासह विविध प्रश्नांवरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
कळंबा तलावात पाणी कमी असल्याने जर अपुरा पाणीपुरवठा होत असेल तर पर्यायी शिंगणापूर पाईपलाईनची व्यवस्था करावी, तसेच या गंभीर पाणीप्रश्नावर ताबतोड उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा असे आ. जयश्री जाधव यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना खडसावून सांगितले. या बैठकीला उपस्थित महिलांनी पाणी पुरवठा करणारे कर्मचारी मनमानी कारभार करतात असे सांगितले. तर संबंधित तसेच अन्य कर्मचारी जर कामात दिरंगाई करीत असतील तर त्यांना कामावरून कमी करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना महापालिका अधिकाऱ्यांना आ.जाधव यांनी दिल्या. तसेच काही भागात रात्री दीड वाजता पाणीपुरवठा करणे योग्य आहे का असा सवाल करत, पाणीप्रश्नी कोणी राजकारण करते का? कि यामध्ये काही राजकारण आहे का? अशी विचारणा देखील आ. जाधव यांनी अधिकाऱ्यांना केली.
ओला कचरा आणि सुका कचरा हा दररोज उचलावा. तसेच प्रत्येक प्रभागात कचरा उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा सज्ज करावी. कचरा उठाव करणाऱ्या नादुरुस्त टिप्पर गाड्या ताबडतोब दुरुस्त कराव्यात अशा सूचना आ. जाधव यांनी दिल्या. पावसाळ्यात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत औषध फवारणी करण्यात यावी असे आ. जाधव यांनी सांगितले. नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी आशा वर्कर्स कार्यरत आहेत. त्यांना नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन आ.जाधव यांनी यावेळी केले.
पाणी आणि कचरा हे नागरिकांचे प्रमुख प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून सुरळीत पाणीपुरवठा आणि दररोज कचरा उठाव करण्यात यावा. महापालिकेकडे जर कर्मचाऱ्यांची कमी असेल तर संबंधित विभागात नोकरभरती करण्यात यावी असे आ. जाधव यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.या गंभीर समस्येची दाद घेत त्यावर योग्य ती आणि लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना आ.जाधव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्याबद्दल उपस्थित तक्रारदार महिलांनी आ.जयश्री जाधव यांचे आभार मानले.या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, शाखा अभियानात मिलिंद जाधव, मिलिंद पाटील, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळ, सुशांत कावडे, माजी नगरसेविका शारदा देवणे, माजी नगरसेवक विनायक फाळके आदींसह नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply