
कोल्हापूर : शाहू मिल विकास आराखडा, कोल्हापूर शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि ठिकठिकाणी भाजी मंडईसाठी निधी मिळवा अशी मागणी विधानसभेत कपात सूचनेद्वारे केल्या होत्या. या सूचना राज्याच्या नगर विकास विभागाने स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या कामांसाठी निधी मिळेल असा विश्वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.कोल्हापूर शहरातील विविध प्रश्न, समस्याबाबत आमदार जयश्री जाधव यांनी २o२३ मधील पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, शासकीय ठराव या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते. आमदार जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी शाहू मिल विकास आराखडा, कोल्हापूर शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि शहरातील जुन्या भाजी मंडईच्या नूतनीकरणासाठी निधी व नवीन भाजी मंडई उभारण्यासाठी निधी मिळवा अशी मागणी केली होती. हे प्रश्न शासनाने दुर्लक्षित केले होते. त्यामुळे आमदार जयश्री जाधव यांनी पुन्हा कपात सूचनेच्या माध्यमातून पुन्हा या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले.शाहू मिल येथे शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे शाहू स्मारक विकास आराखडयास यापूर्वीच्या सरकारने मंजुरी दिली होती. परंतु नंतर सत्तांतर झाल्यामुळे या आराखड्यास गती मिळालेली नाही. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे यथोचित स्मारक कोल्हापूरमध्ये शाहू स्मारक विकास आराखड्याच्या माध्यमातून व्हावे, यासाठी राज्य शासनाने एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी कपात सूचनेच्या माध्यमातून आमदार जाधव यांनी केली आहे.कोल्हापूर मध्ये साडेतीन शक्तीपीठ पैकी पूर्ण पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईचे जागृत देवस्थान आहे. आई अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक व पर्यटक येत असतात. परंतु शहरांमध्ये महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छता गृह उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यटक तसेच स्थानिक महिला व भाविकांची मोठी गैरसोय होते. यामुळे शहरात ठीकठिकाणी महिलांच्यासाठी स्वतंत्र 300 अद्यावत स्वच्छतागृह उभारण्यात यावी अशी मागणी कपात सूचनेच्या माध्यमातून आमदार जाधव यांनी केली आहे.कोल्हापूर शहरात लोकसंख्येच्या तुलनेत भाजी मंडईची संख्या अपुरी आहे. ज्या भाजी मंडई आहेत, त्यांचे नूतनीकरण व सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी नवीन भाजी मंडईची उभारणी करणे आवश्यक आहे. तरी यासाठी शासनाने भरीव निधी द्यावा अशी मागणी कपात सूचनेच्या माध्यमातून आमदार जाधव यांनी केली आहे.सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केलेल्या कपात सूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने स्वीकारल्या आहेत. याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे या विकास कामासाठी राज्य सरकारकडून लवकरच निधी मिळेल आणि या कामांना सुरुवात होईल असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.
Leave a Reply