
कोल्हापूर /प्रतिनिधी : दिलबहार तालीम मंडळाचे यावर्षी गणेशोत्सव असे १३९ वे वर्ष असून यंदाचा गणेशोत्सव हा आध्यात्मिकतेचा धर्मोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी महापौर रामभाऊ फाळके आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विनायक फाळके यांच्या नेतृत्वाखाली हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कुलदैवत दख्खनचा राजा स्वरूपात दरवर्षीप्रमाणे मूर्ती असून शिवशक्ती दर्शन अतिभव्य मंडपात साकारण्यात येणार आहे. यामध्ये केदारनाथ, अमरनाथ, वैष्णवदेवी आणि सप्तशृंगी या स्वयंभू तीर्थक्षेत्रांचे देखावे भव्य स्वरूपात साकारले जाणार आहेत. तसेच देवतांची उपासना करण्यासाठी भव्य मंडपामध्ये गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पंचायतन याग, अथर्वशीर्ष पठण असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पंचायतन यागाचे संपूर्ण विधी करणारे पौरोहित्य गण हैदराबादचे असणार आहेत. तसेच स्थानिक धर्म अभ्यासक एड. प्रसन्न मालेकर यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये रक्तदान, शिबिर नेत्रदान, अवयवदान तसेच वृक्षारोपण आधी सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दि. १७ सप्टेंबर रोजी रविवारी दख्खनचा राजा स्वरूपातील गणेश मूर्तीचे पारंपारिक पद्धतीने आगमन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख पद्माकर कापसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष जनार्दन पाटील, उपाध्यक्ष ओंकार खराडे, मेघराज पोवार, खजानिस आदित्य साळोखे, पवन काळगे, तोफिक मुल्लानी, प्रमोद बोंडगे, प्रसन्न मालेकर उपस्थित होते.
Leave a Reply