
कोल्हापूर : लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून चुल-मुल रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांना मानाचे व्यासपीठ मिळाले. सुमारे १० हजार महिलांनी भागीरथी संस्थेच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभाग दर्शवला. त्यातून आजचा दिवस या महिलांसाठी निखळ आनंदाचा आणि कलागुणांना वाव देणारा ठरला.कोल्हापुरातील धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून गेल्या १४ वर्षापासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शिवाय महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या महिलांना पारंपारिक लोककला, लोकगीते, लोकनृत्याची आवड निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राचा पारंपारिक लोककलेचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जावा, या उद्देशाने दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा रामकृष्ण मल्टिपर्पज लॉनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, जिल्हयातील सुमारे १० हजार महिला एकत्र आल्या. आज सकाळी १० वाजता या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. प्रारंभी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, भाजपच्या महिला शहर अध्यक्षा रूपाराणी निकम, उमा इंगळे, मेघाराणी जाधव, ज्योती पाटील, रेश्मा देसाई, अंशूमाला चराटी, सोनाली नाईक-निंबाळकर, संगीता खाडे, स्मिता ढवळे, दिपाली जाधव, मोहिनी पाटील, धनश्री तोडकर, मेघाराणी जाधव, संगीता सावंत यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून, झिम्मा फुगडी स्पर्धेचे उद्घाटन झाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशिल आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, भविष्यात देखील विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल, असे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात देशाला प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवले आहे. महिलांना आरक्षण देवून, खर्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान झाला आहे, असेही सौ. महाडिक यांनी नमुद केले. तर या स्पर्धेतून महाराष्ट्राची संस्कृती आणि लोक परंपरा जपली जाते. शिवाय महिलांच्या आरोग्य संवर्धनाला हातभार लागतो, असे भाजपच्या महिला शहर अध्यक्षा रूपाराणी निकम आणि मेघाराणी जाधव यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योती पाटील आणि अनिता ढवळे यांनीही भागीरथी महिला संस्थेच्या उपक्रमांविषयी गौरवोद्गार काढलेे. दरम्यान कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तु मला… या मालिकेतील अभिनेत्री जान्हवी किल्लेदार आणि काव्यांजली मालिकेतील अभिनेत्री पूजा पवार यांचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले. त्यावेळी उपस्थित महिलांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. या दोन्ही अिभनेत्रींनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. तर सौ. अरूंधती महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, अभिनेत्री जान्हवी किल्लेदार, पूजा पवार यांनी सुध्दा, झिम्मा आणि फुगडीचा फेर धरला. सकाळी अकरानंतर स्पर्धेला सुरवात झाली. वेगवेगळ्या गटानुसार झिम्मा आणि फुगडीच्या स्पर्धा रंगल्या. झिम्मा, घागर घुमवणे, उखाणे, सूप नाचवणे, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा, पारंपारिक वेशभूषा अशा प्रकारांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत महिलांनी विविध कलाविष्कार सादर केले. काही महिलांनी लेझिमचे उत्तम सादरीकरण केले. त्यावेळी सौ. वैष्णवी महाडिक यांनी सुध्दा लेझिम खेळाचा मनसोक्त आनंद घेतला. दरम्यान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनीही स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून, युवती – महिलांना प्रोत्साहित केले. सायंकाळी स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पार पडला. अभिनेते सिध्दार्थ जाधव, खासदार धनंजय महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या महिलांना रोख बक्षिसं आणि सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेला सौ. पूजा काले – कासलीवाल, जिजाऊ मसाले कराडच्या वैशाली भोसले, तिरूमला खाद्यतेलाचे झोनल सेल्स मॅनेजर संदीप जैन आणि रिजनल मॅनेजर संदीप पाटील यांची विशेष उपस्थिती होती.अभिनेते सिध्दार्थ जाधव, खासदार धनंजय महाडिक, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आज सायंकाळी झिम्मा फुगडी स्पर्धेचा बक्षिण वितरण सोहळा पार पडला. स्पर्धेला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महिलांचे आभार मानून, खासदार धनंजय महाडिक यांनी दरवर्षी स्पर्धेची व्याप्ती वाढवत नेण्याचा मानस व्यक्त केला. दरम्यान स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सहभागी महिलांप्रती सौ. अरूंधती महाडिक यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजी पेठ महिला संघानं पटकावला. या संघाला रोख २५ हजार रूपये, गौरव चिन्ह देण्यात आले. तर राधानगरी तालुक्यातील चंद्रे गावच्या ज्ञानेश्वर माऊली महिला मंडळाला द्वितीय क्रमांकाचं २० हजार रूपये रोख आणि गौरव चिन्ह देण्यात आले. तृतीय क्रमांकाचं १५ हजार रूपये आणि गौरव चिन्ह देवून चंदगड तालुक्यातील कोवाडच्या महालक्ष्मी झिम्मा फुगडी ग्रुपला सन्मानित करण्यात आले. तर गगनबावडा तालुक्यातील किरवे गावच्या घे भरारी महिला संघ, करवीर तालुक्यातील नागदेववाडीच्या दिलदार महिला मंडळ आणि भुदरगड तालुक्यातील नादवडेच्या जोतिर्लींग महिला मंडळाला अनुक्रमे चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक देवून गौरवण्यात आले. या मंडळांना प्रत्येकी ५ हजार १ आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. यावर्षी प्रथमच उदंड प्रतिसाद लाभलेल्या युवतींच्या झिम्मा स्पर्धेमध्ये कोल्हापुरातील निकम पार्क मधील करवीर निवासिनी ग्रुपने प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले. कंदलगावच्या जय जिजाऊ ग्रुपने द्वितीय क्रमांक तर पन्हाळा तालुक्यातील हरपवडे गावच्या हरीओम विठाई ग्रुप युवती मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. या संघांना अनुक्रमे १५ हजार १० हजार ५ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. त्याचप्रमाणे शितल पाटील, रेणूका केकतकर, विद्याराणी सावंत, माधुरी पाटील, जान्हवी सावंत आणि शुभदा कारंडे यांनी विविध स्पर्धा प्रकारांमध्ये विजेतेपद पटकावले. बक्षिस समारंभानंतर उपस्थित महिलांनी वाद्यांच्या तालावर जल्लोष केला.
Leave a Reply