भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत १० हजार महिलांचा सहभाग 

 

कोल्हापूर: लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महिलांना मानाचे व्यासपीठ मिळाले. जिल्हयातील सुमारे १० हजार महिलांनी, भागीरथी संस्थेच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभाग दर्शवला. त्यातून आजचा दिवस या महिलांसाठी निखळ आनंदाचा आणि कलागुणांना वाव देणारा ठरला.धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून, गेल्या १४ वर्षापासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शिवाय महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या महिलांना पारंपारिक लोककला, लोकगीते, लोकनृत्याची आवड निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलेचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जावा, या उद्देशानं दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा रामकृष्ण मल्टिपर्पज लॉनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, जिल्हयातील सुमारे १० हजार महिला एकत्र आल्या. आज सकाळी १० वाजता या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. प्रारंभी खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, सौ. मंगल महाडिक, मंगलताई महाडिक, गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक, क्रिना महाडिक, भाग्यश्री शेटके, सौ. वैष्णवी महाडिक, सौ. मंजीरी महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकिय संचालक पृथ्वीराज महाडिक, भिमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे यांचे आई-वडील, परिक्षक शाहीर राजू राऊत, प्रा. आनंद गिरी, लेखिका मंजुश्री गोखले, कलाशिक्षक सागर बगाडे यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून, झिम्मा फुगडी स्पर्धेचं उद्घाटन झाले. महिला आज आपल्या कर्तृत्वाच्या आणि गुणवत्तेच्या बळावर सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. मात्र या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी व्यक्त केले. एवढया भव्य प्रमाणात झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सौ. अरूंधती महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे अभिनंदन केले. तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं महिला, बांधकाम कामगार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध अनुदानाच्या योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीणीसह विविध योजना सुरू करून सर्वसामान्यांंचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीच्या पाठीशी रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!