
कोल्हापूर : येथील पत्रकार समीर सुधाकर देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी मुंबईत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय समारंभामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीबाबत २०१७-१८ सालचा हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. व्यसनमुक्तीसाठी सातत्याने केलेले लेखन, यासाठी आयोजित केलेले विविध उपक्रम, मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन आणि स्वत: केलेले जनजागरण याची दखल घेत देशपांडे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशपांडे हे मुळचे आजरा तालुक्यातील चिमणे गावचे असून गेली २० वर्षे त्यांनी विविध दैनिकांमध्ये वार्ताहर, वरिष्ठ वार्ताहर,मुख्य प्रतिनिधी, मुख्य उपसंपादक अशा विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते ‘लोकमत’मध्ये वरिष्ठ वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत.
पंधरा हजार रूपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून सामाजिक न्याय विभागाचे मंत्री प्रा. राजकुमार बडोले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र परीक्षेत शिवाजी विद्यापीठात पहिले आलेले देशपांडे यांना याआधी महाराष्ट्र शासन,प्रेस क्लब कोल्हापूर, नेहरू युवा केंद्र, सार्वजनिक ग्रंथालय बेळगाव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह विविध स्वयंसेवी संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
Leave a Reply