
कोल्हापूर : राज्यात गळती व चोरीचे प्रमाण १४ टक्के होते. सध्या ते १८ टक्के झाले आहे. महावितरण गळती कमी करण्यासाठी का उपाययोजना करत नाही. केवळ १५ हजार कोटी रुपये गळती व चोरीच्या वीजेमध्ये जातात. स्वत:ची अकार्यक्षमता लपवण्यासाठी ग्राहकांवर बोजा टाकणे मान्य नाही. तुम्ही स्वत: कार्यक्षम होऊन गळती, चोरी थांबवा अन मग ग्राहकांसमोर वीजदरवाढीचा प्रस्ताव घेऊन या, असे आव्हान काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरूवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.महावितरणने वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला दिला असून त्यावरील हरकतींची सुनावणी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये झाली. ऑनलाईन व ऑफलाईन झालेल्या या सुनावणीला आमदार सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत कृषी, घरगुती व औद्योगिक वीजबिलांच्या अन्यायी दरवाढीची पोलखोल केली.आ. सतेज पाटील म्हणाले, कृषी पंपाला साडेसात एच.पी.पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून जो वीजपुरवठा होतो. त्याचा त्या संस्थेतील प्रति सभासद एच पी केला तर त्या शेतकऱ्यांवर वीजदर वाढीचा बोजा पडणार आहे. विजेच्या गळती व चोरीचे प्रमाण मोठे असतानाही ते थांबवण्यासाठी महावितरण का उपाययोजना करत नाही. तब्बल १५ हजार कोटी रुपये गळती व चोरीमध्ये जातात. स्वत:ची अकार्यक्षमता लपवण्यासाठी ग्राहकांवर बोजा का टाकता, जनरेशनचा खर्च कमी करण्याची भूमिका तुम्ही का घेत नाही. ग्राहकांकडून काढून घ्यायचे अन स्वत:चे लपवायचे हे मान्य नाही, या शब्दांत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी आमदार अरुण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे, विक्रांत पाटील -किणीकर, भारत पाटील भुयेकर, बाबासाहेब देवकर, जावेद मोमीन, कराडचे मनोहर शिंदे, जे सी लाड, रत्नाकर तांबे, आदि उपस्थित होते.
Leave a Reply