
कोल्हापूर : जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाची पाऊल पडत असताना, यात राज्याचा वाटा महत्वाचा असणार आहे. राज्याचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवीत आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आय.टी. क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. यातून स्थानिकांना रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची इतर जिल्ह्यांशी कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. विरोधकांनी निर्माण केलेले गैरसमज दूर होत असल्याने शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात अनेक शेतकरी बांधव पुढे येत आहेत. त्यामुळे महायुती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गास महायुतीच्या सर्वच नेत्यांनी, लोकप्रतिनिधीनी एकजुटीने पाठबळ द्यावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. राज्यात महायुती शासनाच्यावतीने करण्यात येणारा हा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा असेल. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीसह व्यापार वाढीला चालना मिळणार आहे. हा महामार्ग झाल्यास कोल्हापुरात गुंतवणूक वाढीस चालना मिळणार आहे. या महामार्गातून राज्यातील १२ जिल्हे जोडले जाणार आहेत. सदर महामार्गामुळे १८ तासांचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. यामुळे दळणवळणात वाढ होवून पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. एकीकडे देश विकासाच्या प्रगतीपथावर मार्गक्रमण करत असताना विकासाला चालना देणारे प्रकल्प होणे काळाची गरज आहे. दळणवळण, पर्यटन वाढीचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठीच होणार आहे.
पंरतु राजकीय स्वार्थापोटी काही नेत्यांकडून शेतकरी बांधवांची दिशाभूल केली जात आहे. यामध्ये महायुतीचे काही नेते विरोधकांना अंतर्गत मदत करत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब वेदनादायी आहे. या नेत्यांची नेहमीच कॉंग्रेस नेत्यांशी सलग्न अशी भूमिका राहिल्याची बाब आता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आली आहे. हा प्रकल्प महायुतीचा प्रकल्प असून, जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा आहे. विरोधकांनी पसरविलेले गैरसमज दूर होत असल्याने हा महामार्ग व्हावा, यासाठी ज्यांची यामध्ये शेती बाधित होत आहे असे शेतकरी बांधव पुढे येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या व पर्यायाने राज्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी एकजुटीने शक्तीपीठ महामार्गास पाठबळ द्यावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
Leave a Reply