कसबा बावडा येथे ८५ लाखांचा ‘ड्रेनेज घोटाळा’; कागदांवर काम पूर्ण दाखवून पैसे उचलले: सत्यजित कदम यांचा आरोप

 

कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका प्रभाग क्र. २. कसबा बावडा (पूर्व) येथील जाधव घर ते बडबडे मळा दरम्यान रु. २,४२,९५,०८१/- इतक्या खर्चाच्या ड्रेनेज पाइप टाकण्याच्या कामासाठी निविदा क्र. २४ अन्वये टेंडर प्रक्रिया केली होती. यानुसार संबंधित ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली.
मात्र, वस्तुस्थिती पाहता संबंधित ठेकेदाराने केवळ मर्यादित प्रमाणातच प्रत्यक्ष काम केल्याचे निदर्शनास आले असून, त्यांनी एकूण ५ टप्यात बिलाची मागणी केली त्यापैकी ४ बिले त्यांना महानगरपालिके कडून अदा करण्यात आले, उर्वरित काम न करता ५ व्या बिलासाठी बोगस मोजमाप पुस्तक म्हणजे एमबी तयार करून, त्याआधारे अनधिकृतरित्या बिलाची अंदाजे ८५ लाख रुपये महापालिकेने संबंधित ठेकेदारास अदा केली आहे, हि अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.
सदर काम हे अत्यंत गरजेचे असतना या भ्रष्ट कारभारामुळे कसबा बावडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये आणि नागरिकांच्या घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरून शेतीचे व मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत आहे. कोल्हापूर शहरातील अनेक जनआंदोलनात कृती समितीच्या माध्यमातून स्व. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी सुद्धा काम केले आहे.आज काही लोक कृती समितीच्या नावाखाली चांगल्या कामांना व चांगले काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अश्या गोष्टी दिसत नाहीत का? कि ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात, हे जाणून घेणे गरजेचे वाटते. शहरातील ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे पत्र देखील कोल्हापुरातील एका संघटनेने महापालिकेत दिलेले आहे या संघटनेला कोणता अधिकार आहे? असा सवाल देखिल उपस्थित केला.
तसेच या संपूर्ण प्रक्रियेकडे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे जाणवते. यामुळे शासनाच्या निधीची अफरातफर झाल्याचे तसेच कोल्हापूर महानगरपालिकेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, यासंदर्भातील सर्व पुरावे मी महापालिका प्रशासक यांना दिले आहेत.त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच यामध्ये सहभागी असलेल्या ठेकेदार आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बोगस बिलाद्वारे अदा केलेली रक्कम वसूल करण्यात यावी व कसबा बावडा येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे समन्वयक आणि माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम आणि सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!