भागीरथी महिला संस्था लवकरच येणार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर; अध्यक्षा अरुंधती महाडिक यांची माहिती

 

कोल्हापूर: महिलांच्या अंगी उपजत उद्योग व्यवसायाची क्षमता असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, प्रशिक्षण मिळाले, तर या महिला कुटुंबाबरोबरच जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. हा विश्वास मनामध्ये घेऊन, कोल्हापुरात २३ जुलै २००९ रोजी भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्याबरोबर सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या सौ. अरुंधती महाडिक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भागीरथी महिला संस्थेने गावागावात बचत गटाच्या महिलांना एकत्र केले आणि महिला सबलीकरणाच्या प्रवासाला सुरवात झाली. गेल्या १५ वर्षात भागीरथी महिला संस्थेने शेकडो उपक्रम राबवत, हजारो महिलांना स्वावलंबी, सक्षम, उद्योजिका आणि ज्ञानसमृध्द बनवले आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या, १५ वर्षांचा टप्पा पूर्ण करताना भागीरथी संस्थेने कार्यविस्तार आणि संस्था विस्तार केला आहे. त्याद्वारे भागीरथी युवती मंच, भागीरथी वाचनालय, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था अशा नव्या संस्था उदयाला येवून, उत्तम कारभार करत आहेत. भागीरथी युवती मंचद्वारे स्वसंरक्षण, आत्मनिर्भरता, कला-क्रीडा गुणांचा विकास, आरोग्य संवर्धन आणि सामाजिक जाणीवेबाबत प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात आहे. वाचनालयाद्वारे महिलांच्या वाचन चळवळीला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेने जिल्हयातील अनेक गरजू कुटूंबांना अर्थ सहाय्य करून, त्यांना व्यापार, उद्योग आणि व्यवसायासाठी पाठबळ दिले आहे. परिणामी जिल्हयातील असंख्य महिला आज विविध उद्योग – व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहेत. तर अनेक महिलांनी आपापल्या परिसरात छोट्यामोठ्या संस्था काढून त्या उत्तमरित्या चालवल्या आहेत. त्या महिलांनी भागीरथी महिला संस्थेपासूनच प्रेरणा घेतली आहे. तर भागीरथी महिला संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिला आता स्वत: प्रशिक्षीका बनून इतर महिलांना उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन करत आहेत. तर अनेक महिलांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करत समाजकारण आणि राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. विविध पक्षांच्या पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शासकीय अनुदानावर माल वाहतूक करणारी चारचाकी वाहनं आणि व्हॅन्स ग्राहकांना देण्यात आल्या. त्यातून अनेक सभासदांनी भाजी विक्री, फुड व्हॅन, फळ वाहतूक यासह अन्य वाहतूक करत आर्थिक उन्नतीचा मार्ग अवलंबला आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे या कर्ज योजनेसाठी भागीरथी पतसंस्थेला महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
आता त्यापुढे एक पाऊल टाकून भागीरथी संस्थेने स्वतःची वेबसाईट, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि युटयूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोशल मीडियाद्वारे महिलांचे प्रबोधन, त्यांचे सक्षमीकरण आणि जगभर महिलांनी केलेल्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची माहिती महिलांपर्यंत पोचवण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच या वर्षभरात महिलांसाठी आरोग्य विषयक, बौध्दीक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. जिल्हयातील महिलांनी व्यवसाय विषयक मार्गदर्शनासाठी रवी पाटील ९६ ७३ ८१ ९२ ९२ किंवा भागीरथी पतसंस्थेच्या सुप्रिया चौगले यांच्या ८४० ९९ ७५० ५० या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन सौ. अरूंधती महाडिक यांनी केले. पत्रकार परिषदेला सौ.वैष्णवी महाडिक, सौ.अंजली महाडिक, पृथ्वीराज महाडिक, शरयू भोसले, ऍड संयोगिता शेंदूरे, शिवानी पाटील, शितल तिरुके आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!