गांधी मैदानाच्या कामात खो घालण्याचा डाव उधळून लावू : सुजित चव्हाण ; उर्वरित कामास अडीच कोटींचा निधी वर्ग

 

कोल्हापूर  : गांधी मैदान ही फक्त छत्रपती शिवाजी पेठेचीच नाही तर संपूर्ण कोल्हापूरवासीयांची आत्मियता आहे. गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि नेहमीच या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा, हेच उद्योग सद्या एका समाजकंटक टोळक्याकडून सुरु आहेत. गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार असून, याच टोळक्याकडून गांधी मैदानाच्या विकास कामात खो घालायचे, कंत्राटदारावर काम बंद ठेवण्यासाठी दबाव आणायचा असे उद्योग सुरु आहेत. त्यांचा हा डाव शिवसेना उधळून लावेल, असा इशारा देत आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून गांधी मैदानाच्या उर्वरित कामास महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून रु.२ कोटी ५० लाखांचा निधी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती दिली.
गांधी मैदानाच्या कामाबाबत गांधी मैदान येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असणारे गांधी मैदान ही संपूर्ण कोल्हापूर वासीयांची अस्मिता आहे. शिवाजी पेठेत असलेल्या वरुणतीर्थ तळ्याचे १४ सप्टेंबर १९४३ म्हणजेच सुमारे ७२ वर्षांपूर्वी गांधी मैदानात रुपांतर केले. भौगोलिक दृष्टीने हे पाणी साठण्याचे ठिकाण आहे.आमदार मा.श्री.राजेश क्षीरसागर यांनी निधी आणला. हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यावर आहे. कंत्राटदार कुणाच्या राजकीय दबावाला बळी पडून कामात दिरंगाई करत असले तर त्याच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना आमदार मा.श्री.राजेश क्षीरसागर यांनी मा.आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना दिल्या आहेत. असे असताना फक्त बदनामी करून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठीच स्टंटबाजी केली जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत या स्टंटबाजाला जनताच उत्तर देईल. गांधी मैदानाची दुरावस्था थांबविण्यासाठी शिवसेनेने ज्या प्रमाणे निधी दिला. त्याचप्रमाणे शिवसेनाच हे काम पूर्ण करून घेईल. ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर मैदानात पाणी साठण्याचे प्रमाण नक्कीच बंद होणार आहे. त्यामुळे कामाच्या आडवे येणाऱ्या शकुनीमामा आणि स्टंटबाज टोळक्यालाही लवकरच स्वप्नपूर्ती झालेली पहायला मिळेल, असा उपहासात्मक टोलाही जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी लगावला. पत्रकार परिषदेस शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, रुपेश इंगवले, सचिन राऊत, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, शुभम शिंदे, मिलिंद साळोखे, विशाल बोंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!