कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी १८ वे भव्य कृषी व पशूप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते आज शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफसो, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत.उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम,उपमहापौर अक्षय जरग यांची उपस्थिती असणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.याचबरोबर कृषीविषयक आधारित २०० हून अधिक स्टॉल याठिकाणी आहेत.
प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने चार दिवस दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण ५ पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी १०, जिजामाता ५ पुरस्कार, तर युवा शेतकरी ५, आदर्श शेतकरी ५ आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार ५ दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात १३ फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा,
१४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
