कोल्हापूर: महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमती वाढवून पठाणी लुट करत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा जनतेवर पडू दिला नव्हता. त्यावेळी घरगुती सिलिंडर साधारण ४०० रुपयांना मिळत होते, मात्र आता त्यासाठी ९०० रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत. तसेच, सिलिंडर बुकिंगचा कालावधी १५ दिवसांवरून एक महिना करण्यात आल्याने जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही १९०० रुपयांच्या वर गेल्या असून, त्यांचे रेशनिंग केले जात आहे. याचा थेट फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार ज्यांच्या घरच्या जेवणाची सोय नाही अशा लोकांना बसत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय वा व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवण करावे लागते. व्यावसायिक गॅसच्या किमती वाढवल्याने व त्याचे रेशनिंग केल्याने या खाद्य पदार्थांचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार गॅसची टंचाई नसल्याचे सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.
तरी, सर्वसामान्य जनता, छोटे व्यावसायिक आणि हॉटेल चालकांना गॅस सिलिंडर विना अडथळा सहज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याबरोबरच सरकारने वाढवलेल्या गॅसच्या किमती तात्काळ कमी कराव्यात अशी मागणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
