कोल्हापूर: दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या ‘सहज सेवा ट्रस्ट’तर्फे सलग २६ व्या वर्षी गायमुख परिसरात भव्य अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हे अन्नछत्र ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत अहोरात्र सुरू राहणार असून, तब्बल दोन लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील, असा अंदाज आहे. आज या उपक्रमाने आपला रौप्य महोत्सव पूर्ण करून २६ व्या वर्षात अभिमानाने पदार्पण केले आहे. वाडी रत्नागिरी येथील जोतिबाची चैत्र यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून सुमारे सात ते आठ लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यात्रेकरूंची वाढती गर्दी आणि गायमुखावर नव्याने करण्यात आलेली ३००० चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था लक्षात घेऊन यावर्षी अन्नछत्राची भव्य तयारी करण्यात आली आहे. भाविकांना बसून जेवता यावे यासाठी ११० x १४० फूट (१५,००० चौरस फूट) आकाराचा भव्य मंडप उभारण्यात आला असून, चहा व मठ्ठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. आपापल्या गावातून मानाच्या सासनकाठ्या घेऊन पायी चालत येणारे आणि बैलगाडीतून येणारे भाविक कधीही रात्री-अपरात्री डोंगरावर पोहोचतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सहज सेवा ट्रस्टचे हे अन्नछत्र सलग २४ तास खुले असते. अन्नछत्राचा वाढता विस्तार पाहता त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर तजवीज करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने १५,००० किलो बासमती तांदूळ, ३,००० किलो तूरडाळ, ६,००० किलो रवा, १०,००० किलो साखर, ४५० डबे रिफाईंड तेल, ७,००० लिटर दूध, ३,००० किलो बटाटा, ४,००० किलो कांदा, ३०० किलो काळा घेवडा आणि ट्रकभरून भाजीपाला यांसह ४ टन लाकूड आणि २०० गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. ४०० स्वयंसेवकांची अहोरात्र मेहनत
महाप्रसाद तयार करण्यासाठी २० मुख्य आचारी व त्यांचे मदतनीस, भाजी चिरण्यासाठी ३० महिला, ५० वाढपी, भांडी धुण्यासाठी ७० महिला आणि स्वच्छता राखण्यासाठी ५० मजूर तैनात आहेत. यासोबतच सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त, स्नेही आणि हितचिंतक असे सुमारे ४०० स्वयंसेवक अहोरात्र सेवेसाठी सज्ज आहेत.केवळ अन्नदानच नव्हे, तर आरोग्यसेवेचे भान राखत यावर्षी गायमुख परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील सरकारी दवाखाना (सीपीआर) आणि महात्मा गांधी हॉस्पिटल, पारगाव यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाईल. याव्यतिरिक्त, शासनाच्या आरोग्य विभागामार्फत भाविकांसाठी २४ तास वैद्यकीय सेवा आणि एक रुग्णवाहिका सज्ज असणार आहे.सहज सेवा ट्रस्टला सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या असून प्रशासनाचेही मोठे सहकार्य लाभत आहे. हा भव्य उपक्रम समाजाच्या मदतीनेच उभा राहतो. त्यामुळे ज्या दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना या महायज्ञात देणगीरूपाने मदत करायची आहे, त्यांनी ‘सहज सेवा ट्रस्ट’, ३९८ ई वॉर्ड, आशिष चेंबर्स, वसंत बहार सिनेमा समोर, स्टेट बँक कोषागार शाखा, शाहूपुरी, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.संस्थेची धर्मादाय आयुक्त आणि आयकर खात्याकडे नोंदणी असून, दिलेल्या देणगीवर आयकर कायदा कलम ‘८०-जी’ (80G) अन्वये सवलत मिळते. अधिक माहितीसाठी ७४४७४ २७५५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
