पुणे: मराठी भाषा, संस्कृती, परंपरा यांचा प्रचार-प्रसार आणि जागतिक स्तरावर मराठी समाजाचे एकत्रीकरण साधणे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’ या नव्या जागतिक व्यासपीठाचा भव्य शुभारंभ महाराष्ट्र दिनी शुक्रवारी १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता ऐतिहासिक आळंदी येथे होत आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपासानिध्यात फाउंडेशनच्या संकल्पनेचे प्रणेते आणि लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वात फ्रुटवाले धर्मशाळा, आळंदी येथे हा सोहळा पार पडणार आहे.मराठी भाषा, संस्कृती आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने आमदार सुभाष बापू देशमुख (सोलापूर) यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून ते संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आ. सुभाष देशमुख यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे होते आणि त्यातून उद्योगाला एक उभारी मिळाली. आ. देशमुख यांच्या कल्पक प्रयत्नातून हे नवे, जागतिक व्यासपीठ आकाराला आले असून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या ६६ व्या वर्धापनदिनी त्याचा शुभारंभ होत आहे.या शुभारंभ कार्यक्रमासाठी ज्येष्ठ निरूपणकार व प्रख्यात वक्ते विवेक घळसासी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर, नामांकित उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
