विद्यानृसिंह भारती पीठातर्फे मान्यवरांचा गौरव

 

कोल्हापूर : विज्ञान आणि संस्कारांची सांगड घालून आज त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल, याचे संशोधन करण्याचा प्रयत्न पीठाच्या माध्यमातून सुरू आहे, असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज केले.श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील पीठामध्ये २६ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये समाजात विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार स्वामींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आशीर्वचन देताना स्वामीजी बोलत होते.

स्वामीजी म्हणाले, वेदांचा व्यवहारामध्ये काय उपयोग, संस्कार कसे उपयोगी आहेत, नवजात बालकाला मध, तूप आणि सोन्याचे चाटण का द्यायचे, नारळ पाणी जेवणाअगोदर व जेवणानंतर घेतल्यावर शरीरावर काय परिणाम होतो, अशा गोष्टींचे संशोधन त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकरवी पीठाच्या वतीने करण्यात येत आहे.यावेळी वैदिक पुरस्कार वे.शा.सं. मंदार महेश पुजारी (नृसिंहवाडी), सांस्कृतिक पुरस्कार वे.शा.सं. डॉ. सीताराम नारायण जोशी (परभणी), कीर्तनकार पुरस्कार हभप रामचंद्रबुवा प्रभाकर भिडे (पुणे), स्थानिक वैदिक पुरस्कार वे.शा.सं योगेश मुरलीधर खरे (कोल्हापूर), सामाजिक गौरव डॉ. हेमंत विंझे (मुंबई), महिला कीर्तनकार हभप सौ. वर्षा वसंत बेडेकर (नागपूर), होतकरू विद्यार्थी वेदांत विजयकुमार जोशी (नांदेड), चिन्मय बाळकृष्ण कुलकर्णी (जालना), उत्कृष्ट शासकीय कर्मचारी विजय जोशी (पुणे), डॉ. नंदकुमार जोशी, प्रमोदशास्त्रा कुलकर्णी यांना शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी स्वागत केले. अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर रामकृष्ण देशपांडे यांनी आभार मानले. धनंजय मालू यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.दरम्यान, उद्या, १ मे रोजी महाप्रसाद व पालखी प्रदक्षिणाने उत्सवाची सांगता होईल. यावेळी पीठामध्ये दुपारी ४ वाजता पालखीचे पूजन होऊन शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी लवाजमासह करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास जाईल. तेथून पुन्हा पीठात येईल.

Comments are closed.

error: Content is protected !!