महिलांसाठी सज्ज झाली अत्याधुनिक ‘वुलू पावडर रूम’

 

कोल्हापूर: शाहू मैदान केएमटी बस स्टॉप येथे आज एका ऐतिहासिक आणि अत्यंत स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ झाला.कोल्हापूर महानगरपालिकेचा विशेष निधी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या विशेष पुढाकारातून, कोल्हापुरात प्रथमच महिलांसाठी ‘वुलू पावडर रूम’ हा अत्याधुनिक प्रकल्प साकारण्यात आला आहे. आज आंतरराष्ट्रीय मातृदिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या ऐतिहासिक प्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिल्पा खोत आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान यावेळी करण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अंबाबाई मंदिर, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ प्रसाधनगृहांची मोठी उणीव होती. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जात होता, मात्र आता महानगरपालिकेच्या विशेष प्रयत्नांतून आणि कृष्णराज महाडिक यांच्या दूरदृष्टीमुळे हा देखणा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे, ज्याचा आम्हास अभिमान वाटतो. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हा प्रकल्प केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये सुरू व्हावा, अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे करणार आहोत.यावेळी या प्रकल्पाचे प्रमुख मा. मनीष केळशीकर, उपमहापौर मा. अक्षय जरग, मा. महेश जाधव, मा. विशाल शिराळे, मा. आदिल फरास यांच्यासह महानगरपालिकेच्या नगरसेविका व नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments are closed.

error: Content is protected !!