कोल्हापूर महापालिकेचा ‘कागदी’ वृक्षारोपण घोटाळा : हिंदु विधिज्ञ परिषदेच्या माहिती अधिकार आणि प्रत्यक्ष पाहणीतून धक्कादायक वास्तव समोर

 

कोल्हापूर : महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अंतर्गत महानगरपालिकांवर शहरात वृक्षारोपण करणे, त्यांचे संगोपन करणे आणि पर्यावरण रक्षण करण्याचे कायदेशीर बंधन आहे. नागरिकांकडून वसूल केल्या जाणार्‍या ‘वृक्ष उपकराचा’ निधी या कामासाठी वापरणे बंधनकारक आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अनेक ठिकाणी प्रत्यक्षात कोणतीही झाडे न लावता केवळ कागदोपत्री आकड्यांचा खेळ करून प्रत्यक्षात झाडे लावलीच नसल्याचे माहिती अधिकारातून, तसेच हिंदू विधीज्ञ परिषदेच्या सदस्यांनी प्रत्यक्ष केलेल्या पहाणीत समोर आले. यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत, अशी माहिती हिंदू विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी  बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले,महानगरपालिकेने माहिती अधिकाराच्या अंतर्गत दिलेल्या माहितीत परस्परविरोधी आकडेवारी दिली आहे. 31 जुलै 2026 रोजी दिलेल्या उत्तरात वर्ष 2024 मध्ये 3,140 झाडे लावल्याचे म्हटले आहे, तर 24 सप्टेंबर 2026 च्या दुसर्‍या उत्तरात हा आकडा 5,590 असल्याचे सांगण्यात आला आहे. दोन्ही उत्तरात तब्बल 2,450 झाडांचा फरक असून यात स्पष्टपणे फेरफार करण्यात आल्याचे दिसून येते. वर्ष 2025 मधील आकडेवारीही अत्यंत संशयास्पद आहेमहापालिकेने 2024 मध्ये विद्यापीठ परिसरात 700 झाडे लावल्याचा दावा केला; मात्र, याच संदर्भात शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या माहिती अधिकाराच्या माहितीमध्ये महापालिकेकडून त्यांना एकही वृक्ष प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. कृषी महाविद्यालयात महापालिकेने या विद्यालयात 106 झाडे लावल्याचा दावा केला आहे; प्रत्यक्षात या विद्यालयाने दिलेल्या उत्तरात मिळालेली रोप ही सामाजिक वनीकरण विभाग आणि विद्यार्थ्यांकडून रोपे मिळाली असे सांगण्यात आले आहे.

पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय येथे 252 झाडे लावल्याचा दावा फोल ठरला असून, त्या कार्यालयाला शासनाकडून इतर स्रोतांतून 102 झाडे भेट मिळाली होती. कळंबा येथील ‘आय.टी.आय.’ महाविद्यालय येथे 103 झाडे लावल्याचा दावा करण्यात आला, पण महाविद्यालयाने महापालिकेचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.रेणुका मंदिराजवळ श्‍वास वाटीकेत 1005 झाडे लावल्याचा दावा केला आहे. आमच्या सदस्यांनी भेट देऊन पहाणी केली असता तेथे अधिकाधिक 70 ते 80 झाडेच आढळली. तपोवन मैदान परिसरात 2357 झाडे लावल्याचे सांगितले. प्रत्यक्षात या संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती विचारली असता ‘माहिती उपलब्ध नाही’, असे उत्तर देण्यात आले आहे. यावरून तिथे एकही झाडे लावले नाही, हेच समोर येते. या सर्वांवरून महापालिकेकडील नोंदींचा एकमेकांशी ताळमेळ बसत नाही आणि त्यामध्ये फेरफार केलेला आहे, प्रत्यक्ष भेटींमधून झाडे अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच त्रयस्थ पक्षांनी (इतर कार्यालयांनी) प्रतिवादींकडून कोणतीही झाडे किंवा रोपे मिळाल्याचे नाकारले आहे हेच समोर येते. या सर्वावरून प्रत्यक्षात झाडे लावलीच नाहीत, तसेच विकत आणलेलीच नसून ती केवळ कागदोपत्री लावल्याचे समोर येते.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!