कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षात महायुतीच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास येत असलेल्या विकास कामांचे लोकार्पण तसेच प्रस्ताविक कामांचा शुभारंभ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दि.२६ जून करण्याचा आमचा मानस आहे. त्याअनुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही सर्व कामे उच्च दर्जाची ठेवून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर करून त्यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण करून राजर्षी शाहू जयंतीदिनी कोल्हापूरकरांना ही मोठी विकास भेट देता येईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांचा लोकार्पण सोहळा येत्या २६ जून रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्याचा महायुती शासनाचा मानस आहे. यामध्ये प्रामुख्याने रंकाळा तलाव येथील म्युझिकल फौंऊटेन, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, गांधी मैदान जलनिस्सारण प्रकल्प, शहरातील शाहूकालीन तालीम संस्थांच्या पुर्नबांधणी केलेल्या इमारती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग इमारत, १०० ई बसेस, अमृत योजनेतून बसविण्यात आलेले एस.टी.पी. प्लांट आदी पूर्णत्वास येत आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा यासह पूरनियंत्रण प्रकल्पाचा पहिला टप्पा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या कामांचा उद्घाटन सोहळा समाविष्ठ आहे. या विकास कामांमुळे कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. येत्या २६ जून रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त किंवा ८ ऑगस्ट या रंगकर्मी दिनानिमित्त मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची वेळ घेवून लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती दिली.श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात भुयारी मार्ग प्रकल्पाचे आराखडे समाविष्ठ करा असे आमदार क्षीरसागर यांनी सूचना दिल्या.
