कोल्हापूर: एकच जिद्द शक्तिपीठ रद्द या घोषणा देत शक्ती पीठ महामार्गाविरोधात दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या विराट मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ गावांमधून प्रस्तावित असलेल्या या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत महिला शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाले असल्याची घोषणा केली होती. ज्या निवडणुकीत त्यांनी राधानगरी भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ रद्द झाल्याची घोषणा केली होती त्याच तालुक्यातून सर्वाधिक जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी वज्रमुठ केली असून एक इंचही मोजणी न करण्याचा निर्धार या सभेतून करण्यात आला आहे.यावेळी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार जयंत पाटील , मा. आमदार संपतबापू पाटील , मा आमदार ऋतुराज पाटील , मा आमदार सत्यजित पाटील , शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष विजय देवणे , गिरीष फोंडे , कॅा. सम्राट मोरे , अजित पोवार , माळशिरस तालुक्यातील जि. प. सदस्य के के पाटील , ॲड. लक्ष्मण आबा मगर , जि. प. सदस्य मनोज फराकटे , हिंदुराव पाटील , बाळासाहेब खाडे , कॅा. संपत देसाई यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
