कोल्हापूर: करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होत, कोल्हापूरच्या वैभवात ऐतिहासिक भर घालणाऱ्या १५०० कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्याचा शुभारंभ आणि भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होत, आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सभेला देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह, राज्याचे मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या समवेत उपस्थित राहून जनतेला संबोधित केले.आदरणीय पंतप्रधान. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरच्या कायापालटासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा, विमानतळ आधुनिकीकरण आणि रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण, सर्किट बेंच, शासकीय रुग्णालय यांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे.
या जाहीर सभेमध्ये कोल्हापूरच्या जागतिक दर्जाच्या पर्यटनाला गती देण्यासाठी देशातील केदारनाथ, बद्रीनाथ आणि वाराणसी या इतर प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यामध्ये भाविकांच्या सोयीसाठी सुनियोजित पार्किंग व्यवस्था, स्थानिक व्यापाऱ्यांसाठी अत्याधुनिक दुकानांची निर्मिती आणि आई अंबाबाईच्या ठिकाणी प्रसाद योजनेअंतर्गत एक स्वतंत्र व सुसज्ज यंत्रणा उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली. हा सोहळा म्हणजे भक्ती आणि प्रगतीचा एक अद्भूत संगम असून, कोल्हापूरला देशातील सर्वोत्तम तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्णपणे कटिबद्ध आहोत.
यावेळी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबाबाई शक्तीपीठाच्या आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाचा गौरव केला. अमित शाह यांच्या हस्ते आज या पवित्र विकासकामांची सुरुवात होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरच्या पवित्र भूमीत, कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिराच्या भव्य कॉरिडॉरमध्ये सुमारे १५०० कोटी रुपयांच्या अवाढव्य खर्चातून आणि २८५८ वर्ग मीटर क्षेत्रावर साकारणारा हा कॉरिडॉर सातव्या शतकातील या प्राचीन मंदिराला एक नवे आधुनिक रूप देणार आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील ४१ छोट्या-मोठ्या मंदिरांचे जतन करून, संपूर्ण परिसराची एआय (AI) कॅमेरे आणि अत्याधुनिक एलईडी प्रकाशव्यवस्थेने सुरक्षा व शोभा वाढवली जाईल. तसेच यामध्ये आउटडोर गॅलरी, हेरिटेज वॉक, भव्य अन्नछत्र आणि मल्टिपर्पज हॉल यांसारख्या सुविधा अवघ्या ६ महिन्यांत निर्माण केल्या जातील, ज्यामुळे हे क्षेत्र एका जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्रात परिवर्तित होईल, असा विश्वास या कृतज्ञता सोहळ्यात अमितभाईशाह यांनी दिला.यावेळी राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे खासदार,सर्व आमदार, महापौर, नगरसेवक व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
