कोल्हापूर: दुसऱ्या महायुद्धाच्या नरसंहारात पोलंड वासियांना मदतीचा हात देणारा भारत हा पहिला देश आणि कोल्हापूर मधील छत्रपती हे पहिले राजे होते. अशा भावना पोलंड देशाच्या संसद सदस्या आणि पोलंड – भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांनी व्यक्त केल्या.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सन १९४२ ते १९४८ या सात वर्षाच्या कालावधीत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं पाच हजार निर्वासित पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी वळिवडे इथं विशेष छावणी उभारण्यात आली होती. या कालावधीत कोल्हापूरच्या जनतेनं पोलिश नागरिकांना निर्वासित म्हणून नाही तरघराच्या पाहुण्याप्रमाणे वागणूक दिली होती.
याच ऋणानुबंधातून २०१९ मध्ये त्याकाळी कोल्हापूर मध्ये वास्तवास असणाऱ्या पोलंड नागरिकांनी वळिवडे इथं भेट दिली होती. यासह येथील संग्रलायाचा कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हा ऐतिहासीक वारसा नव्यानं पुढं आणला होता. वळिवडे येथील संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पोलंडच्या पंतप्रधानांचा या वर्षअखेरीस कोल्हापूर दौरा प्रस्तावित आहे. याच पार्श्वभूमीवर पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळ कोल्हापूर दौऱ्यावर आलं होतं. त्यांनी वळिवडे इथं भेट देऊन इतिहासाला उजाळा दिला. यानंतर साजयी हॉटेल या ठिकाणी कार्यक्रम पार पडला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते या सर्व शिष्टमंडळाच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी, दुसऱ्या महायुद्धातील १९४२ ते १९४८ दरम्यानच्या इतिहासाला उजाळा दिला. ही सध्या तिसरी पिढी असून आजही तितकाच जिव्हाळा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण पोलंड आणि कोल्हापूरकर यांच्यात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पोलंड देशाच्या संसद सदस्या आणि पोलंड – भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांनी, त्यावेळच्या भीषण परिस्थितीचा व्हिडिओ पाहताना आपल्या मुलांचा चेहरा समोर आल्याच्या भावना व्यक्त केल्या. दुसरं महायुद्धाच्या नरसंहारात फक्त सैनिक नाही तर सामान्य आणि निष्पाप पोलंड नागरिकांचा सुद्धा बळी गेला. अशा हतबल परिस्थितीत पोलंड वासियांना मदतीचा हात देणारा भारत हा पहिला देश आणि कोल्हापूर मधील छत्रपती हे पहिले राजे होते. असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्या काळात वळिवडे कॅम्प मध्ये आम्हाला आपुलकीची वागणूक मिळाली, आमचा धर्म जोपासण्यासाठी चर्चची निर्मिती करण्यात आली. आमच्या मुलांसाठी शाळा स्थापन करण्यात आल्या. सर्व प्रकारचं स्वातंत्र्य या ठिकाणी उपभोगता आलं, असं त्यांनी सांगितलं. आजच्या भेटीचा हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आणि भावनिक असल्याचं सांगत, इथं होणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून मानवतावाद अधोरेखित होईल, त्याचबरोबर लवकरच या संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात येईल, असा विश्वास किंगा गायेव्स्का यांनी व्यक्त केला.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, हा फक्त समारंभ नाही तर त्यावेळच्या ऐतिहासिक पर्वाची नव्यानं सुरुवात आहे. पोलिश नागरिक यांच्याशी असलेलं हे ऋणानुबंधाचं नातं सर्व जगापुढं आणण्याची जबाबदारी आपली आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा विचार पुढं घेऊन जाण्याची आणि त्यांचा वारसा जिवंत ठेवण्याची संधी प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई येथील पोलंडचे वाणिज्यदूत तोमास्झ विएलगोमास यांनी, हे आमचं सेकंड होम असल्याचं सांगत भारतीय पोलिश दोन्ही नागरिकांनी आज ही हा जिव्हाळा जपलाय. तो पुढं असाच वृद्धिंगत होत जावो अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
दिल्ली येथील पोलीश इन्स्टिट्यूटच्या संचालक आणि मंत्री डॉक्टर मालगोझारता वायसीस – गोवेंबियाक यांनी, हा आमच्यासाठी भावनिक क्षण असल्याचं सांगत आज आम्ही आपल्या घरी आल्याची भावना व्यक्त केली.डॉ. शिका जैन यांनी, प्रस्तावित वळिवडे संग्रहालय कसं असणाराय याबद्दल पीपीटीच्या माध्यमातून माहिती दिली.
यानंतर किंगा गायेव्स्का यांनी १९४२ ते ४८ दरम्यान वळिवडे मधील पोलिश नागरिकांनी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तू आणि छायाचित्र वळिवडे इथं होणाऱ्या संग्रालयासाठी भेट दिल्या. यामधील प्रत्येक ऐतिहासिक वस्तूच त्यांनी सविस्तर महत्व सांगितलं. यात कपडे, लहान मुलांची खेळणी, डायरी आदींचा समावेश आहे.
यावेळी पोलीस कुटुंबाच्या वंशज अपेक्षा निरंजन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मीन, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, बाळ पाटणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
