कोल्हापूर: हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर फुफ्फुसांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार असतानाही अत्यंत आव्हानात्मक ‘मिनिमली इनवेसिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग’ (MICS-CABG) शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. आजच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक वेळी पूर्ण छाती उघडण्याची आवश्यकता नसते. निवडक रुग्णांमध्ये ‘मिनिमली इनवेसिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग’सारख्या अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीद्वारे छातीच्या बाजूला छोट्या छेदातून, आवश्यकतेनुसार दुर्बिणीच्या सहाय्याने, बायपास शस्त्रक्रिया करता येते. याच आधुनिक उपचारपद्धतीचा वापर करत, फुफ्फुसांमध्ये गंभीर स्वरूपाचे चिकटणे असतानाही रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.फुफ्फुसांमधील गंभीर चिकटण्यामुळे शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेला शस्त्रक्रियेचा मार्ग अधिक गुंतागुंतीचा झाला होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही ह्रदयरोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. सयाजी सरगर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अचूक नियोजन, सर्जिकल कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. या संपूर्ण उपचारप्रक्रियेत सर्जिकल टीम, ॲनेस्थेशिया टीम, कार्डियाक क्रिटिकल केअर टीम आणि नर्सिंग टीम यांच्यातील उत्कृष्ट समन्वय महत्त्वाचा ठरला.
ही यशस्वी शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अद्यावत ह्र्दयरोग विभाग, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांचे उल्लेखनीय उदाहरण आहे. सिद्धगिरी हॉस्पिटलचा प्रयत्न हा केवळ अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यापुरता मर्यादित नसून, प्रगत उपचारांची गरज असलेल्या रुग्णांपर्यंत या सुविधांचा लाभ पोहोचवणे हा आहे. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या ध्येयाने सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत शस्त्रक्रिया पद्धती, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि समर्पित वैद्यकीय टीम यांच्या माध्यमातून रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
