आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने तीन दिवस धार्मिक कार्यक्रम

 

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री श्री रविशंकर संस्थापित आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वैदिक धर्म संस्थानतर्फे १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान शाहूपुरीतील आयर्विन हॉलमध्ये तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळूर येथील वेद विज्ञान विद्यापीठातील प्रशिक्षित पंडितांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी होणार आहेत, अशी माहिती संयोजक ब्रह्मचारी पुण्यश्लोक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डिंपल गजवानी यांची उपस्थिती होती.

ब्रह्मचारी पुण्यश्लोक म्हणाले, शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता महागणपती होमाने सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर वास्तू होम आणि नवग्रह होम होतील.सायंकाळी महासुदर्शन होम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी रुद्रपूजा आणि रुद्रहोम होईल. सायंकाळी महाचंडी कलशस्थापना, चंडी पारायण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रविवारी (ता. १८) सकाळी महाचंडी होम होणार आहे.
यावेळी गोपूजा, अश्वपूजा, कन्यापूजन, सुहासिनी पूजन आणि दांपत्य पूजन असे विविध धार्मिक विधी होतील. सोहळ्याची सांगता महाप्रसादाने होणार आहे. हे सर्व विधी सर्वांसाठी खुले असणार आहेत. तरी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.पत्रकार परिषदेस सचिन लाड, उदय बडस्कर, प्रणव लोले, मानसिंग जाधव, समीर बखले, करण पवार, राहुल नागवेकर, मंदिर चव्हाण, पद्मजित जाधव, विराज चव्हाण, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!