सोलापूर-पंढरपूर तालुक्यातील नांदोरे आणि आव्हे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करून, शेतकऱ्यांना घरांमध्येच नजरकैदेत ठेवत प्रशासनानं जबरदस्तीने शक्तिपीठ महामार्गाची जमीन मोजणी उरकल्याचा गंभीर घडला होता. या हुकूमशाही आणि बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ ‘शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन शेतजमीनींची मोजणी जबरदस्तीने न करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शक्तिपीठ महामार्गाची मोजणी तात्काळ थांबवा, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर मग त्याला शासन जबाबदार राहिल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिला.
गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारण्यापेक्षा हा १ लाख कोटी रुपयांचा गरज नसलेला प्रकल्प रद्द करून, तो निधी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि जनतेच्या भल्यासाठी वापरण्यात यावा अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली.
पंढरपूर तालुक्यातील नांदोरे आणि आव्हे गावात जमिन मोजणी दरम्यान प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी शेकडो पोलिसांसह नांदोरे आणि आव्हे या गावांना घेराव घातला.अनेक शेतकऱ्यांना तसेच त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला घरातच नजरकैदेत ठेवत प्रशासनाने जबरदस्तीने शक्तिपीठ महामार्गाची जमीन मोजणी उरकली होती. या कारवाईच्या निषेधार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,खासदार प्रणिती शिंदे, आमदार जयंत पाटील,आमदार सतेज पाटील, आमदार अभिजीत पाटील, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली ‘शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेत दडपशाहीचा जाब विचारला.
यावेळी गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी करताना पोलीस बंंदोबस्त कशासाठी ठेवला?असा सवाल खा. धैर्यशील मोहिते – पाटील यांनी केला. सरकारने अशा प्रकारे हुकूमशाही चालवून शेतकऱ्यांचा अंत बघू नये, असे खा. प्रणिती शिंदे यांनी सांगितले.समन्वयक गिरीश फोंडे यांनी जबरदस्तीने मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जबरदस्तीने सुरु असलेली मोजणी तात्काळ थांबवा, मोजणी करणाऱ्या प्रांताधिकारी, तहसीलदार आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. राज्यातील १३ जिल्ह्यांतील प्रस्तावित सर्व मोजण्या तात्काळ थांबवण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना देण्यात आले. जमिनीचा ताबा वाचवण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत परस्पर मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. या वेळी एका पोलीस अधिकाऱ्याने “खुशाल आत्महत्या करा, आम्हाला काही फरक पडत नाही,” अशी निर्दयी भाषा वापरल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.शेतकऱ्यांचा विरोध असताना सोलापुरातील एकाही गावात अधिकाऱ्यांनी पाय ठेवू नये, असा इशाराही संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आला. यावेळी जयश्री मोहिते पाटील, के. के. पाटील, के डी पाटील, अभिजित हराळे, दिनकर पाटील, सोमनाथ शिंदे, सतीश माने-देशमुख, रामेश्वर लोखंडे, धैर्यशील हेंदाळ, बालाजी भुसारे, कृष्णात पाटील, शिवाजी कांबळे, रणजित पाटील, ॲड. लक्ष्मण मगर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर आणि चंद्रकांत मगर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
