
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शारिरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी त्यांच्या गरजेनुसार स्वावलंबी व्यवसाय अभ्यासक्रम जरुर राबविण्यात येतील. त्यासाठी नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमांची निकड आहे, याची माहिती अशा सेवकांनी द्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. विद्यापीठात आज जागतिक अपंग दिनानिमित्त विद्यापीठात कार्यरत प्रशासकीय सेवकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
गणित अधिविभाग सभागृहात झालेल्या या सोहळ्यास प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे उपस्थित होते.
उपस्थित सेवकांशी संवाद साधताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, अपंग या शब्दापेक्षा शारिरिकदृष्ट्या आव्हानाने ग्रस्त हा शब्द मला अधिक उचित असतो. त्याव्यतिरिक्त आपण सारे धडधाकट व्यक्तींपेक्षा कितीतरी सक्षम आहात. आपल्यांत धडधाकटांपेक्षा कितीतरी पटीने अधिक इच्छाशक्ती आहे. आपला प्रामाणिकपणा, व्यवस्थेबद्दल आदर, कामाप्रती निष्ठा कौतुकास्पद आहे. आपली संस्थेप्रती बांधिलकी आणि सहनशीलता या गोष्टींना मी सलाम करतो. त्याचबरोबर आपण शारिरिकदृष्ट्या अक्षम असालही, पण कृती आणि कामात आपण कितीतरी सक्षम आहात, हे आपण आपल्या सेवेतून सिद्ध केले आहे, याचा मला नितांत आदर व अभिमान आहे. आपल्या आवश्यकतेप्रमाणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत स्वावलंबी व्यवसाय अभ्यासक्रम जरुर राबवू. फक्त आपल्याला कोणत्या प्रकारच्या अभ्यासक्रमाची गरज आहे, ते आपण सांगावे. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यापीठ घेईल. आपणास सहानुभूतीऐवजी सन्मानानेच वागविले जाईल, याची दक्षता विद्यापीठ सदैव घेईल, याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे पुढील वर्षी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहासमोरील हिरवळीवर हा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे युवराज मिठारी, सूरज सनदे, अनिल भेंडेकर व बाजीराव शेंडे यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. सहाय्यक कुलसचिव दीपक अडगळे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले, तर उपकुलसचिव जी.आर. पळसे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील शारिरिकदृष्ट्या दुर्बल प्रशासकीय सेवकांसह परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply