तायक्वांदो खेळाडू झाला अभिनेता

 
नशीब एखाद्याला कुठे, कसं घेऊन जाईल हे काहीच सांगता येत नाही. हाच अनुभव आला हिमांशू विसाळे या तायक्वांडो खेळाडूला… आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला हा खेळाडू आता सोबत या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येत आहे.कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला “सोबत”हा चित्रपट २५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.हिमांशू विसाळेबरोबर मोनालिसा बागल नायिकेच्या भूमिकेत आहे. तसंच रुचिरा जाधव, गिरीश परदेशी, स्मिता गोंदकर, नागेश भोसले, प्रदीप वेलणकर, विजय गोखले, मनोज टाकणे, अभिलाषा पाटील, अश्विन पाटील, कौस्तुभ जोशी या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. मिलिंद उके यांनी ‘सोबत’ चं दिग्दर्शन केलं आहे. सोबत ही गोष्ट आहे करण आणि गौरी या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १८ वर्ष  वयाच्या प्रेमिकाची,  गौरीच्या घरून असलेल्या विरोधाला तोंड देत करण गौरीशी लग्न करतो.आपल्या लग्नाचं समर्थन करताना तो प्रश्न उपस्थित करतो कि, वयाच्या १८व्या वर्षी आम्हाला  देशाचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे पण स्वतःची बायको नाही हा कसला कायदा? वयाच्या १८व्या वर्षी प्रौढ म्हणून आम्ही गुन्हेगार ठरू शकतो, पण प्रौढ म्हणून लग्न नाही करू शकत हा कसला कायदा ? असे अनेक प्रश्न हे कथानक उभं करत. आपल्या आजुबाजूला घडणारा ताजा विषय मनोरंजक पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आला आहे. 
आपल्या पदार्पणाविषयी हिमांशू म्हणाला, ‘मला आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं होतं. तेव्हा सगळीकडे पोस्टर्स लागली होती. त्या पोस्टरवरचा माझा फोटो पाहून सोबतच्या निर्मात्यांनी चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. यापूर्वी कधी चित्रपटात काम केलं नव्हतं. मात्र, शाळेत असताना नाटकांतून काम केलं होतं. त्यामुळे एक संधी म्हणून या चित्रपटात काम केलं.’सोबत”मध्ये काम करण्याचा अनुभव फारच छान होता. मिलिंद उके यांच्यासारखे अनुभवी दिग्दर्शक, अनुभवी स्टारकास्ट असल्याने खूप शिकायला मिळालं. प्रत्येक सीनपूर्वी रिहर्सल करत असल्याने शूटिंग सहज पार पडलं. आता पुढे जाऊन अभिनयच करेन असं काही ठरवलेलं नाही. संधी मिळाली, तर अभिनय करत राहीन, असंही हिमांशूनं सांगितलं. योगायोगानं अभिनय क्षेत्रात आलेल्या एका तायक्वांडो खेळाडूचा चित्रपटातला परफॉर्मन्स पहाणं नक्कीच रंजक ठरणार आहे. २५ मे रोजी “सोबत” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!