
नवी दिल्ली : संपूर्ण कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या शिवाजी पुलाचे रखडलेले काम सुरू करण्यास राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणच्या सोमवारच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला असून शिवाजी पुलाचे काम सुरू करण्यास सर्व परवानग्या या बैठकीत देण्यात आल्याची व उर्वरित तांत्रिक बाबीची पूर्तता पूर्ण करण्याची जबाबदारी क्षेत्रीय संचालक (पश्चिम) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण व राष्ट्रीय स्मारके प्राधिकरण नंबिराजन यांच्याकडे दिली असल्याची माहिती राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणच्या अध्यक्षा प्रो. सुष्मिता पांडे व सदस्य सचिव नवनीत सोनी यांनी बैठक झाल्यानंतर लगेच खा.संभाजीराजे छत्रपती यांना दिली.
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोमवारचा ४ जूनचा दिवस आनंदाचा ठरला असून गेली दोन वर्षे केलेल्या अथक परिश्रमाला आज यश मिळाले. धन्यवाद कोल्हापूरकर,आपल्या लढ्याबद्दल, आपण दिलेल्या ऊर्जेबद्दल.कोल्हापूरवासीयांना दिलेले वचन मी आज पूर्ण केले याचे मला व्यक्तीशः खूप मोठे समाधान असल्याची भावना खा. संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
शिवाजी पुलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार संभाजीराजे गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. संभाजीराजे यांनी पंतप्रधान कार्यलय व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग व राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाचे यावेळी आभार मानले.
Leave a Reply