चिकोत्रा प्रश्नी किसान सभेच्यावतीने महामार्ग रोको

 

कागल: अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी (चिकोत्रा) प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नासंदर्भात भुदरगड आजरा व उपअभियंता चिकोत्रा मध्यम प्रकल्प शाखा गारगोटी यांना वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केली आहे. याच संदर्भात 21 मे 2018 रोजी लिंगणूर (कापशी) येथे निपाणी राधानगर ह्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून पाटबंधारे अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून आठ दिवसात संबधित अधिकारी व संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले गेले होते. परंतु आजपर्यंत शासन व प्रशासनाकडून काहीही प्रयत्न झाले नाहीत. शासनाच्या या मग्रूर भूमिकेचा निषेध म्हणून चिकोत्रा खोऱ्यातील सर्व शेतकरी कागल येथे महामार्ग रोको आंदोलन करून मागण्यांकडे लक्ष वेधले. यात हेळ्याचा देव येथून वाया जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. आरळगुंडी येथून जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. भावेश्वरी मंदिर (दिंडेवाडी) परिसरामधून जाणारे पाणी  चिकोत्रा धरणात वळवा. म्हातारीचे पठार व शिवारबा पठार येथून जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. चिकोत्रा धरणाची गळती ताबडतोब काढा. हिरण्यकेशी नदीकडे जाणारे अतिरिक्त पाणी कॅनॉल मधून चिकोत्रा धरणात वळवा.पुनर्वसनासह दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पूर्ण करा. चिकोत्रा धरणाचे जलस्तोत्र बळकटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीचे जिल्हा नियोजन मंडळातून ताबडतोब तरतूद करा.वरील मागण्याची पूर्तता 10 जूनपूर्वी करावी. अन्यथा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर 1 जुलै 2018 रोजी चिकोत्रा धरणक्षेत्रातून भर पावसात मोटार सायकलवरून भिजत रॅली काढण्याचा इशारा देण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व अखिल भातीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. संभाजी यादव , कॉ. शिवाजीराव मगदूम, दयानंद पाटील नंद्याळकर यांनी केले. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!