
कोल्हापूर : सरकारची कामगिरी पाहता आता लहान मुलाला विचारले तरी हे सरकार जाणार असेच सांगेल. त्यामुळे सरकारविरोधात आक्रमकपणे बाहेर पडले पाहिजे. राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. गेली दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिनी रविवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा सांगता समारंभ होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. रविवारी पुण्यात होणाऱ्या हल्लाबोल सांगता मेळाव्याला जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्ते रवाना होतील, असेही त्यांनी सांगितले.
साखर पॅकेजची खिल्ली उडवत हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारचे पॅकेज म्हणजे साखर उद्योगाच्या डोळयात धूळफेक आहे. सामान्य माणसाला अल्प व्याजदराने कर्जपुरवठा व्हावा, यासाठी राष्ट्रीयकृत बॅँका सुरू झाल्या पण आता उद्योगपतींनीच या बॅँका बुडविल्या. त्यामुळे या नाकर्ते सरकारला घालविल्याशिवाय शांत बसायचे नाही.
यावेळी ए.वाय.पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, संगीता खाडे, आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार के. पी. पाटील, उपमहापौर महेश सावंत, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, भैया माने, मधूकर जांभळे, सर्जेराव पाटील-गवशीकर, शिवानंद माळी, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते. रोहित पाटील यांनी आभार मानले.
Leave a Reply