मेडिकल असोसिएशनचा सामाजिक उपक्रम; गरजू रुग्णांसाठी हेल्थ कार्ड ची सुविधा

 

कोल्हापूर: कोल्हापूर मेडिकल असोसिएशन १९२४साली स्थापन झाली. इंडियन मेडिकल असोसिएशन १९२८ साली स्थापन झाली. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने असोसिएशनच्या ९४ व्या वर्षी ‘आरोग्यसेवा आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत असोसिएशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘आओ गाव चले’ कार्यक्रमाअंतर्गत जनसेवा विभागातर्फे एक प्रामाणिक व निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ या मोहिमेचा शुभारंभ एप्रिल २०१८ रोजी करण्यात आला. यामार्फत महिन्यातून कमीत कमी एक मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे.२०१९-१९ साली एक सकारात्मक बदल व प्रामाणिक सामाजिक बांधिलकी या नात्याने या मोहिमेअंतर्गत १२ मोफत आरोग्य शिबिरे कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गरजू रुग्णांसाठी घेण्याचे असोसिएशन ठरवले आहे. आत्तापर्यंत राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर व कसबा सांगाव येथे शिबिरे यशस्वीरित्या घेतली गेली. याला अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच शाहूवाडी तालुक्यात अकोले येथे पुढील शिबिर घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना योग्य व माफक दरात उपचार मिळावेत यासाठी ‘हेल्थ कार्ड’ ही संकल्पना असोसिएशनच्या वतीने राबवण्यात येणार आहे.अशी माहिती मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच असोसिएशनच्या जनजागृती विभागातर्फे एक सामाजिक उपक्रम जाहीर केला आहे. पूर्वापार चालत आलेली रोगाची अनुपस्थिती म्हणजे निरोगीपण ही व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने सुधारून मानसिक, शारीरिक सामाजिक आर्थिक व पर्यावरण पूरक संतुलन म्हणजेच निरोगीपण अशी केली आहे. सदर व्याख्येला अनुसरून प्रत्येक भारतीयाचे आरोग्य चांगले असले पाहिजे यासाठी स्वतः व्यक्तीने, समाजाने, सामाजिक संघटनांनी व शासनाने आपापल्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर मेडिकल असोसिएशन कोल्हापूरच्या आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम हाती घेत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत रविवारी १७ जून रोजी सकाळी १० ते २ या वेळेत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. यामध्ये हृदयरोग समज-गैरसमज, वाढते वजन लठ्ठपणा, हाडांच्या समस्या, मानसिक आजार, महिलांचे आजार, होमिओपॅथी/ आयुर्वेदिक उपयुक्तता याविषयी रविवारी १७ जून रोजी शाहू स्मारक भवन येथे सुप्रसिद्ध हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.श्रीकांत कोले आणि सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना लोकांशी संवाद साधणार आहेत.याची लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉ. संदीप साळोखे, मानद सचिव डॉ. आबासाहेब शिर्के,जन आरोग्य विभाग प्रमुख डॉ. शैलेश कोरे,ओपन फोरम चे डॉ. दिलीप शिंदे,माजी अध्यक्ष डॉ. रविंद्र शिंदे,सल्लागार समिती सदस्य डॉ.पी. एम.चौगुले, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. आशा जाधव,डॉ. ए. बी.पाटील,डॉ. रमाकांत दगडे,डॉ. देवेंद्र होशिंग,डॉ. नवीन घोटणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!