
कोल्हापूर: राष्ट्रीय एकात्मता आणि डॉल्बीमुक्त कोल्हापूर या उद्देशाने कार्यरत असलेले कोल्हापुरातील सर्वात पहिले ‘करवीर नाद ढोल ताशा पथक’ आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या पायरीवर आपले पहिले पाऊल टाकत आहे. या पथकाने कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी स्वतःची वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. डॉल्बीच्या युगात ढोल-ताशा सारख्या आपली संस्कृती जपणाऱ्या पारंपारिक वाद्यांचा वारसा पुढे न्हेत या पथकाने युवापिढीसमोर आदर्श ठेवला आहे. ‘करवीर नाद’ हे फक्त नाव नसून एक चळवळ आहे. ही चळवळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी यासाठी करवीर नादने www.karveernad.com नावाची वेबसाईट आणि Karveer Nad या नावाने मोबाईल अप्लिकेशन तयार केले आहे. या वेबसाईट व मोबाईल ॲप चे उद्घाटन येत्या रविवारी १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शाहू स्मारक भवन येथे खासदार. श्री. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती करवीर नाद च्या कलाकार जान्हवी धर्माधिकारी, प्राजक्ता ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
१७५ कलाकारांपासून सुरुवात झालेल्या या पथकात सध्या ३५० हून अधिक सभासद कलाकार आहेत. शिस्त आणि अप्रतिम वादनाच्या जोरावर अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीत कोल्हापूरचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. या पथकाने आतापर्यंत ५२ सादरीकरणाचे प्रयोग करून नावलौकिक मिळवला आहे. अंबाबाई रथोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज रथ, छत्रपती महाराणी ताराराणी रथ, रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा, श्री स्वामी समर्थ कोल्हापूर ते अक्कलकोट पदयात्रा या ठिकाणी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले. करवीर वासियांसाठी ‘नाद सोहळा २०१७’ या तीन दिवसीय सोहळ्याचे ही आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने सामाजिक बांधीलकी म्हणून अनेक सामाजिक उपक्रमही या पथकाने राबविले आहेत. यामध्ये मोफत आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, बालकल्याण संकुल मधील मुलांना धान्यवाटप, कर्करोग ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली. तरी कोल्हापूरच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवला जात असल्यामुळे या कार्यक्रमास जास्तीत जास्त करवीरवासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करवीर नाद ढोल ताशा पथकाचा वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला अमेय कातवरे, केतकी जमदग्नी, विक्रम देवणे, प्रमोद खेमे,ऋतुराज मोरे,गणेश मांडवकर, गौरव माने,निखील नलवडे,विशाल मांडरे,शुभम मिरजकर, अभय हावळ, सुमित सोनाळीकर,रोणक सूर्यवंशी, सुयश जगताप उपस्थित होते.
Leave a Reply