ड्राय डे’च्या कलाकारांनी दिला’डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ चा संदेश

 

ठाणे: आजच्या तरुणाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. खास करून, वर्षारंभाच्या सप्ताहात याचे प्रमाण वाढत असल्यामुळे ‘दारू पिऊन वाहने चालवू नका’  या मोहिमेअंतर्गत अनेक संस्था पोलिसांना सहाय्य करताना दिसून येतात. मात्र केवळ,  ३१ डिसेंबरच्या सप्ताहातच नव्हे तर’कधीच दारू पिऊन वाहने चालवू नका’ असा समाजहिताय संदेश आगामी ‘ड्राय डे’ सिनेमाच्या संपूर्ण टीमने नागरिकांना दिला आहे.

ठाणे येथील तीन हात नाका येथे नुकत्याच राबविण्यात आलेल्या ‘डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ मोहिमेमध्ये,  ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी, कैलाश वाघमारे,  मोनालिसा बागल आणि आयली घिए या सिनेमाच्या कलाकारांनी वाहतूक पोलिसांसोबत, ‘डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा संदेश असलेले ग्रीटींग्स आणि गुलाबाची फुले वाहन चालकांना वाटली. तसेच वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांना शुभेच्छापत्र देखील दिली. विशेष म्हणजे, या मोहिमेला वाहतूक पोलिस आणि रहिवाश्यांचादेखील भरघोस प्रतिसाद लाभला. दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे जीवितहानी होण्याची अधिक शक्यता असल्याकारणामुळे वाहन चालवताना ‘ड्राय डे’  पाळा,  असा गोड उपदेश सिनेमाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी लोकांना दिला आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत हा सिनेमा येत्या १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव लिखित तसेच नितीन दीक्षित संवाद व पटकथा लिखित ‘ड्राय डे’  या सिनेमामध्ये आजच्या तरुण पिढीचे भावविश्व दाखविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!