
कोल्हापूर: दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याबद्दल सर्वप्रथम राज्य शासनाचे अभिनंदन आणि आभार मानून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध उपक्रम राबवणार्या धनंजय महाडिक युवा शक्तीने, गेली ८ वर्षे दहीहंडीचा उपक्रम यशस्वी पणे राबवला आहे. यंदा सोमवार, ३ सप्टेंबर २०१८ रोजी युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक मैदान येथे तब्बल ३ लाख रूपयांची दहीहंडी फोडण्यासाठी, गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावतीने दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. शिवाय युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. त्यामध्ये पाच थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला ७ हजार रूपये आणि सहा थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १२ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणार्या गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आली आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. समीट ऍडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर्सचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दहीहंडी फोडणारा गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. तर महिला गोविंदा पथकांना २५ हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे प्रशस्त अशा दसरा चौक मैदानावर दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन केले आहे. उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. सार्थक क्रिएशनच्या कलाकारांचा नृत्याविष्कार आणि श्रीमंत ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण ही युवाशक्ती दहीहंडीची वैशिष्टये आहेत. तर डी जे रणजित आपल्या कलाकौशल्यातून तरुणाईला नाचवेल. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होणार आहे. युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. या स्पर्धेला गोकुळ दूध संघ, बालाजी कलेक्शन हे प्रायोजक असून, समृध्दी सोलर हे सहप्रायोजक आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. दहीहंडी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूर वासियांनी ३ सप्टेंबरला ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी मिलिंद धोंड यांच्या सह युवाशक्ती कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply