
कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा औरंगाबादमध्ये नागरी सत्कार
कोल्हापूर : सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराज व भारताचे सामाजिक अभियंते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांची परंपरा जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरु या नात्याने आपण करु, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.देवानंद शिंदे यांची निवड झाल्याबद्दल औरंगाबादच्या सम्यक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचार्य डॉ.इंद्रजित आल्टे यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत प्रा.अविनाश डोळस कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सौ. अनिता शिंदे यांच्यासह डॉ.वाल्मिक सरवदे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नगरीमध्ये दलित, बहुजन व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणाबरोबरच सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाचा आणि त्याच बरोबर परिसराचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा व वारसा माझ्या पाठीशी आहे. शाहू महाराजांच्या विचाराने काम करण्याची संधी मला करवीर नगरीत मिळाल्याचा खूप मोठा आनंद आहे.
यावेळी प्रा. डोळस यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ म्हणून ओळख मिळविलेल्या डॉ.शिंदे यांनी विद्यापीठाला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, डॉ. आल्टे यांनी डॉ. देवानंद शिंदे यांच्या रूपाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक विभागातून थेट कुलगुरू पदावर पोहोचण्याचा सन्मान प्रथमच लाभल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ.वाल्मिक सरवदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.संजय मून यांनी सूत्रसंचालन तर सिध्दार्थ आल्टे यांनी आभार मानले.
सुरवातीला डॉ.शिंदे यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
Leave a Reply