
कोल्हापूर :बहिणीने घरातून पळून जाऊन प्रेम व आंतरजातीय विवाह केल्यानंतर गावकरी मस्करी करत असल्याने चिडलेल्या दोन भावांनी बहीण व तिच्या पतीचा चाकूचे सपासप वार करून खून केल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. कसबा बावडा येथील गणेश कॉलनी येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हे हत्याकांड घडलं. ऑनर किलिंगच्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून दोन भावांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.इंद्रजीत श्रीकांत कुलकर्णी (वय २३, मूळ गाव बच्चे सावर्डे, ता. पन्हाळा) व मेघा इंद्रजीत कुलकर्णी (२०, मूळ गाव थेरगांव, ता. शाहूवाडी) अशी मृतांची नावे आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मेघा यांचा थोरला भाऊ गणेश महेंद्र पाटील (२०) व धाकटा भाऊ जयदीप महेंद्र पाटील (१९, दोघे, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी) यांच्यासह त्यांचा मित्र नितीन रामचंद्र काशीद (२२, रा. सातवे, ता. पन्हाळा) या तिघांना अटक केली.इंद्रजीत व मेघा यांच्या प्रेमसंबधाला मेघाच्या घरच्यांकडून विरोध होता. त्याला न जुमानता, दीड वर्षापूर्वी दोघांनी पळून जाऊन विवाह केला होता. तेव्हा, मेघाच्या घरच्यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, आपण सज्ञान असून मर्जीने विवाह केल्याचे मेघाने शाहूवाडी पोलिसांना त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर मेघाच्या घरच्यांनी इंद्रजीतला धमकावल्यानं ते दोघं पुण्याला राहायला गेले होते. त्यानंतर, सहा महिन्यापूर्वी कसबा बावडा येथील गणेश कॉलनीत प्रभाकर माधव यांच्या घरी इंद्रजीत-मेघानं भाड्याने खोली घेतली होती. इंद्रजीत हा एका हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत होता तर मेघा ताराराबाई पार्क येथील डी मार्ट येथे काम करत होती.महिन्याभरापूर्वी डी मार्ट येथे मेघाचा धाकटा भाऊ जयदीप तिला भेटला. परजातीत विवाह केल्याबद्दल त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. मेघाच्या लग्नावरून गावकरी दोन्ही भावांना चिडवत असत. त्यामुळे बहिणीवर आणि पतीवर त्यांचा प्रचंड राग होता. त्यांना ठार मारण्याची संधीच ते शोधत होते.बुधवारी (१६ डिसेंबर) गणेश व जयदीपचा चुलत मामा वैभव जाधव याचा विवाह होता. विवाहाच्या वरातील नाचण्याच्या निमित्ताने ते घरातून बाहेर पडले. त्यांनी इंद्रजीत व मेघाचा खून करण्याचा कट रचला होता. त्यांनी कटात नितीन काशिदला सहभागी करून घेतले. नितीनच्या मोटार सायकलवरून ते बुधवारी रात्री साडेनऊ वाजता मेघाच्या घरी गेले, तर नितीन बाहेरच थांबला. दोघा भावांनी मेघाला चहा करायला सांगितले. यावेळी मेघाचा पती इंद्रजीत दूध आणायला गल्लीतील दुकानात गेला. मेघा चहा करत असताना पाठमोरी होती. तेव्हा दोघांनी तिच्यावर चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मेघा ओरडू लागल्यावर तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून त्यांनी तिच्यावर पुन्हा वार केले. मेघा मरण पावल्याची खात्री करून त्यांनी तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर दोघे इंद्रजीतची वाट पाहत बसले. इंद्रजीत खोलीत येताच दोघांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. इंद्रजीतने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. इंद्रजीत ओरडू लागल्यावर घराच्या मालकीण वंदना जिन्यातून वर येऊ लागल्या. पण, त्यांना धक्का मारून गणेश व जयदीप नितीनच्या मोटार सायकलवरून पसार झाल दरम्यान, मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान दोघांनी इंद्रजीत-मेघाच्या खुनाची कबुली दिल्यावर आज सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.
Leave a Reply