निर्माते राज सरकार यांचा पहिला मराठी सिनेमा ‘फ्लिकर’चा मुहूर्त

 

कोल्हापूर : निर्माते राज सरकार यांचा पहिला मराठी सिनेमा ‘फ्लिकर’चा मुहूर्त आज कोल्हापूर येथील पार्वती मल्टिप्लेक्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.
प्रत्येक क्षेत्राप्रमाणे सिनेसृष्टीमध्येही हौशी लोकांची संख्या कमी नाही, पण काहीजण मात्र मनोभावे सिनेसृष्टीची सेवा करण्याच्या उद्देशाने सिनेमे बनवत रसिकांच्या मनोरंजनाचा वसा जपतात. महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आपल्या कोणत्याही कार्याची सुरूवात करणारे निर्माते राज सरकार यांनीही रसिकांची सेवा करण्याचं व्रत जोपासत ‘फ्लिकर’ या आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती सुरू केली आहे.
राज सरकार यांनी ‘महेक फिल्म्स’च्या बनरखाली ‘फ्लिकर’ या सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. पदार्पणातच सर्वार्थाने विविध वैशिष्टयांनी नटलेला परिपूर्ण मराठी सिनेमा रसिक दरबारी सादर करण्याचा सरकार यांचा मानस आहे. आपल्या मातृभाषेबाबत मनात अत्यंत आपुलकीची भावना असणा-या सरकार यांच्या म्हणण्यानुसार मराठी सिनेमा आशय आणि विषयाच्या बाबतीत जागतिक सिनेमाच्या तोडीचा आहेच, पण त्याला आणखी ग्लॅमरची जोड देण्याचा प्रयत्न ‘फ्लिकर’च्या निमित्ताने केला जात आहे. याबाबत विस्ताराने बोलताना सरकार म्हणाले की, हा सिनेमा केवळ मनोरंजन करणारा नसून जीवन जगण्याचा अचूक मंत्र सांगणाराही असेल. मनाला भिडणारं कथानक, कर्णमधुर संगीत, सहजसुंदर अभिनय, नेत्रदीपक सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे बनवला जाणारा ‘फ्लिकर’ हा सिनेमा मराठी रसिकांसोबतच अमराठी प्रेक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांनाही आपलासा वाटणारा ठरेल असा विश्वास सरकार यांनी व्यक्त केला.
‘फ्लिकर’च्या माध्यमातून मराठी सिनेपटलावर राजवीर सरकार या नव्या ता-याचा उदय होणार आहे. हँडसम लुक, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज, लक्षवेधी अभिनयशैली असं व्यक्तीमत्त्व असणा-या राजवीरचा हा पहिलाच सिनेमा असला तरी रसिकांवर मोहिनी घालण्याची क्षमता त्याच्या ठायी आहे. राजवीरच्या जोडीला तन्वी किशोर ही अभिनेत्री या सिनेमात चमकणार आहे. दोघांची अनोखी केमिस्ट्री या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल पाडावे करीत आहेत.
‘फ्लिकर’मध्ये राजवीर आणि तन्वीसह सयाजी शिंदे, संजय मोने, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरूण कदम, गौरव घाटणेकर, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, विशाखा सुभेदार, प्रभाकर मोरे, सायली जाधव, प्रतिक्षा शिर्के या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच अमोल पाडावे यांनीच या सिनेमाची कथादेखील लिहिली आहे. पटकथा जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिली असून संवाद समीर सामंत आणि मंदार चोळकर यांचे आहेत. कमेरामन उदयसिंग मोहिते या सिनेमाचे छायांकन करीत असून महेश पावसकर असोसिएट दिग्दर्शक आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी संदिप काळे यांच्याकडे असून प्रशांत राणे या सिनेमाचे कला दिग्दर्शक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!