‘तुझ्यात जीव रंगला’ च्या सेटवर दिवाळीची धामधूम  : उत्सव कलाकरांचा

 

‘तुझ्यात जीव रंगला’ च्या सेटवर दिवाळीची धामधूम  : उत्सव कलाकरांचा

सगळ्यांची लाडकी दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे.ऐन सणाला सुट्टी मिळावी म्हणून मराठी मालिकांच्या सेटवरही शूटिंगची एकच लगबग सुरू आहे. एपिसोडची बँक तयार करून ठेवण्यासाठी दिवस-रात्र शूटिंग केले जात आहे. डबल शिफ्ट मध्ये काम सुरू आहे. यातच गायकवाड कुटुंबाची दिवाळी जोरात असणार आहे. कशी असणार त्यांची दिवाळी…. हे प्रत्यक्षात पाहायला मिळाले ‘तुझ्यात जीव रंगला’च्या सेटवर. सेट वरील सर्वच कलाकारांनी स्पीड न्यूज शी बोलताना दिवाळीबद्दल धम्माल गप्पा मारल्या. तर जाणून घेऊया प्रत्येकाला काय वाटते दिवाळी बद्दल….

आईला चकली तळायला मी मदतही करतो… : राणा

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका महाराष्ट्राबरोबरच जिथे जिथे मराठी प्रेक्षक आहे तिथपर्यंत लोकप्रिय झाली. नुकताच 650 भागांचा टप्पा पूर्ण केला. या मालिकेतील सर्वांचा लाडका राणादा म्हणजेच हार्दिक जोशी याची मालिकेतील ही तिसरी दिवाळी आहे. कोल्हापूर – कुस्ती हे जणू समीकरण आहे. मी अभिनेता आहे पैलवान नाही. मुंबईचा असूनही संपूर्ण महाराष्ट्राचा खेळ असणाऱ्या कुस्तीच्या पैलवानाची भूमिका मला साकारायला मिळाली आणि प्रेक्षकांनी याला डोक्यावर घेतले.मला खूप शिकायला मिळाले.

 आमच्या घरीही पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. आईला चकली तळायला मी मदतही करतो. प्रेक्षकांची पोच पावती मिळते खूप छान वाटते. सेटवर नेहमीच धम्माल असते. या वर्षी गायकवाड कुटुंबाची तिसरी दिवाळी आहे. दिवाळी एपिसोडमध्ये पारंपारिक पद्धतीनेच प्रेक्षकांना दिवाळी पाहायला मिळणार आहे.

चकली खूप आवडते : सुरज

मालिकेतील सुरज म्हणजे राज हंचनाळे याला दिवाळीच्या फराळातील चकली प्रचंड आवडते असे सूरजने सांगितले. दिवाळी हा सण प्रेमाचा आनंदाचा उत्साहाचा सण असतो. गेली तीन वर्षे एकत्रितपणे सेटवर सगळेच सण उत्साहात साजरे करतोय.हे आमचे कुटुंब बनला आहे. मालिकेमुळे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचण्याची संधी मिळाली. नुकतेच या मालिकेला तब्बल अकरा अवॉर्ड मिळाले आहेत. हे सर्व यश या मालिकेसाठी मेहनत घेणाऱ्या मालिकेच्या संपूर्ण टीमचे आहे आणि मायबाप प्रेक्षकांना मुळे आम्ही इथे आहोत असे सूरजने दिवाळी च्या एपिसोड शूटिंग दरम्यान सांगितले.

मी प्रचंड गोड खाते : नंदिता 

दिवाळीच्या एपिसोडच शूटिंग जोरात सुरू आहे. या दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’च्या सेटवर दिवाळी कशी असते हे जाणून घेण्याचा योग आला.नंदिता वहिनी म्हणजेच धनश्री कडगावकर ला गोड पदार्थ खायला प्रचंड आवडतात. आणि दिवाळीच्या पदार्थातील करंज्या, लाडू सारखे गोड पदार्थ खूपच आवडतात. असे ती म्हणाली पुण्या-मुंबईत दिवाळी नॉर्मल पद्धतीने दिवे- पणत्या लावून, अभ्यंगस्नान करून साजरी करतात. पण कोल्हापुरात उटणं लावताना देखील पोट थंड राहू दे..पाठ थंड राहू दे.. असे म्हणून पारंपारिक दिवाळी साजरी करतात, हे मला खुप आवडलं. सेटवर प्रत्येक जण एक एक पदार्थ बनवून आणत आहे. घरी जाण्याची हुरहुर आहेच. पण गेली तीन वर्षे संपूर्ण टीम एकनिष्ठपणे काम करत आहे. म्हणून तर ही मालिका इतकी लोकप्रिय झाली आणि मला नुकतेच उत्कृष्ट खलनायिकेची अवार्डही मिळाले. पण प्रत्यक्ष आयुष्यात मी तशी नाही असे धनश्री स्पीड न्यूजशी बोलताना म्हणाली.

सेटवर घरच्यासारखेच वाटते… गोदाक्का 

मी कोल्हापूरचीच आहे त्यामुळे  ‘तुझ्यात जीव रंगला’ च्या सेटवर शूटिंग सुरू आहे पण मला शूटिंग करतोय असं कधी जाणवलच नाही, मी घरच्याप्रमाणे इथेही वावरते. प्रत्येक सणाला कोल्हापूरची संस्कृती जपते. परंपरेनुसार रुढी प्रथा सांगते. त्या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. वसगडे गावातील लोकांच्या सहकार्यामुळेच गेली तीन वर्षे या गावात शूटिंग व्यवस्थित सुरू आहे. सहकलाकारांचे उत्तम सहकार्य नेहमीच मिळते. लाइट्समन व तंत्रज्ञ खूप मेहनत घेतात.त्यामुळे इतकी लोकप्रियता मिळाली. दिवाळीनिमित्त कोल्हापूरची खासियत असणारे पदार्थ सेटवर बनत आहेत. मी कोल्हापुरात असले तरी कधी एकदा वसगडेत येते याची मला ओढ लागते. आपल्या कोल्हापूरला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अशा भावना मालिकेतील गोदाक्का म्हणजे छायाताई सांगावकर यांनी व्यक्त केल्या. मालिकेतून फक्त मनोरंजनच नाही तर शिक्षणाचे, शेतीचे, एकत्र कुटुंबाचे महत्त्व, मुलींनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये असे मोलाचे संदेश दिले आहेत. दिवाळीच्या विशेष भागाचे सध्या शूटिंग सुरू आहे. मला दिवाळीचा फराळ करायला आणि खाऊ घालायला खूप आवडतो असे छायाताई म्हणाल्या.

हि मालिका संस्कृती व संस्कार यांच्या आधार आहे : आबा 

गेली अडीच तीन वर्षे आम्ही कुटुंबापासून लांब आहे. पण सेटवरच आमचं एक वेगळं कुटुंब बनलं आहे. इथं आम्ही जास्त एकत्र असल्याने हेच आमचं घर आहे असे आम्हाला वाटते. फक्त दिवाळीच नाही तर प्रत्येक सण आम्ही इथे साजरा करतो. स्पॉटबॉयपासून सर्व कलाकार लाइट्समन, तंत्रज्ञ यांचे वाढदिवस आम्ही साजरे करतोय. समान मान समान वागणूक यामुळे आम्ही बांधले गेलो आहोत. सेटवर दिवाळी एपिसोड च्या शूटिंगची गडबड सुरू आहे. शूटिंग पूर्ण झाल्यावर आम्हाला दोन दिवसाची सुट्टी मिळणार आहे. पण प्रेक्षकांना जी मालिका पाहायला मिळते त्याच्या मागे अनेक लोकांचे अपार कष्ट आहेत. 80 लोक सोळा तास काम करत असतात. तेव्हा ही मालिका लोकांपर्यंत पोहोचते. ही कोल्हापूरच्या मातीतली गोष्ट आहे. पण ग्रामीण भागात इतक्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.मुंबईत सर्व गोष्टी उपलब्ध असतानाही कोल्हापुरात शूटिंग करून दिग्दर्शक अनिकेत साने यांनी अवघड काम पूर्ण केले आहे. त्यामुळे कोल्हापूरची संस्कृती, सण, परंपरा खऱ्या स्वरूपात लोकांपर्यंत या मालिकेद्वारे पोहोचल्या आहेत. संस्कृती व संस्कार यांच्या आधार म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आहे असे गायकवाड कुटुंबातील प्रमुख प्रतापराव गायकवाड (आबा) म्हणजेच मिलिंद दास्ताने यांनी स्पीड न्यूजशी मुलाखतीमध्ये सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!