
कोल्हापूर: ( नवाब शेख)घरातील एखादी व्यक्ती दिवंगत झाली तर त्या व्यक्तीच्या स्मृतिदिनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नातेवाईकांसाठी भोजन केले जाते. पण या परंपरेला छेद देत प्रबोधनपर उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या दिवंगत पत्नीला आदरांजली वाहण्याचा अनोखा उपक्रम कोल्हापुरातील मिरासाहेब मगदूम या शिक्षण संस्थाचालकांने राबवला. कोल्हापुरातील भोसलेवाडी परिसरात सुसंस्कार शिक्षण मंडळ ही शिक्षण संस्था गेली पंचवीस वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. या संस्थेच्या माझी शाळा, सुसंस्कार हायस्कूल आणि अभिनव बालक मंदिर अशा तीन शाखा आहेत. या संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती स्वर्गीय नर्गिस मगदूम यांचे चार वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. 6 नोव्हेंबर रोजी नर्गिस मगदूम यांचा चौथा स्मृतिदिन होता. या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाला सामाजिक कार्याची जोड देत मगदूम कुटुंबीयांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. दिपवाळीच्या पूर्वसंध्येला या कुटुंबातर्फे समाजातील जवळपास पंधरा कुटुंबांना तीस हजार रुपयांची आर्थिक मदत तर हेरले गावातील मशिदीच्या बांधकामासाठी अर्थसहाय्य करण्यात आले. दिवंगत नर्गिस मगदूम यांच्या स्मृतिदिनी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रख्यात साहित्यिक विचारवंत, लेखक व माजी प्राचार्य डॉ. जी.पी माळी यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. माणसं की देव माणसं? या विषयावर जी.पी माळी यांनी आपल्या प्रगल्भ विचारातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात दिवंगत लेखक शिक्षक हुसेन जमादार यांच्या स्मरणार्थ सुसंस्कार हायस्कूलची होतकरू विद्यार्थिनी सानिया फिरोज सदलगे हिला जमादार कुटुंबियांच्या वतीने एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. अशाप्रकारे कोणत्याही धार्मिक अवडंबर न माजवता मगदूम कुटुंबीयांनी समाजामध्ये एक सामाजिक संदेश देऊन नवा पायंडा पाडला आहे.
Leave a Reply