
सन 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या लहान मुलाची भूमिका रंगविलेला छोटा सरदार आठवतो आहे का? हा मुलगा आता तरूण झाला असून ‘जीनिअस’ या चित्रपटात तो एका अतिशय धूर्त मास्टरमाइंडची भूमिका रंगवीत आहे. गदर- एक प्रेमकथा, सिंगसाब द ग्रेट, हीरो- द लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाय, अब तुम्हारे हवाले वतन साथीयोंयासारख्या जबरदस्त हिट चित्रपटांचे निर्माते अनिल शर्मा यांच्या मुलाचे, उत्कर्ष शर्मा याचे ‘जीनिअस’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट क्षेत्रात पदार्पण होत आहे. ईशिता चौहान हिचाही हा पहिलाच चित्रपटच असून ती यात नायिकेच्या भूमिकेत आहे. त्यांना नवाझुद्दिन सिद्दिकी आणि मिथुन चक्रवर्ती यासारख्या नामवंत कलाकारांची साथ लाभली आहे. ‘ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चॅनल’ असलेल्या ‘झी सिनेमा’ वाहिनीवररविवार, 18 नोव्हेंबर रोजी रात्री 9.00 वाजता‘जीनिअस’ या चित्रपटाचा प्रीमिअर प्रसारित होणार आहे.
प्रणय, संगीत, देशभक्ती आणि थरारक अॅक्शन यांनी भरलेल्या या चित्रपटाची कथा मनाची पकड घेणारी आहे. दैवी मानसिक शक्ती लाभलेल्या एका अनाथ मुलाची ही कथा असून प्रेमासाठी हा मुलगा कोणत्याही टोकाला जाण्यास तयार असतो. वेगवान आणि उत्कंठावर्धक कथानक असलेल्या या चित्रपटाला हिमेश रेसमिया याने संगीत दिले असून अरिजित सिंह, आतिफ अस्लम, जुबिन नौटियाल आणि इतरांनी ही गाणी गायली आहेत.
‘झी सिनेमा’ वाहिनीवर होत असलेल्या ‘जीनिअस’च्या जागतिक टीव्ही प्रीमिअरच्या निमित्त उत्कर्ष शर्माने सांगितले, “‘जीनिअस’ हा एक विलक्षण उत्कंठावर्धक आणि संपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट आहे. प्रणय, नाट्यमय प्रसंग, जबरदस्त अॅक्शन प्रसंग, थरार आणि गूढरहस्य हे सारे घटक या एकाच चित्रपटात एकवटलेले आहेत. हा दोन अत्यंत बुध्दिमान आणि धूर्त मनांचा संघर्ष असून त्यातील एक प्रतिभावान व्यक्ती नवाझुद्दिनसरांनी साकारली असून दुसरी मी साकारली आहे. या कथेला भरपूर कलाटण्या मिळतात.”
निर्माते अनिल शर्मा म्हणाले, “माझ्या मते, आजच्या काळात चित्रपटनिर्मितीत आमूलाग्र बदल घडला आहे. मी नेहमी चित्रपटाची कथा प्रथम लिहितो आणि नंतर नायकाच्या भूमिकेतील अभिनेत्याची निवड करतो. यामुळे मला या कथेला अनुरूप अशा सुयोग्य कलाकाराची निवड करणं सोपं जातं. जीनिअस हा चित्रपट माझा मुलगा उत्कर्ष याच्या पदार्पणासाठी उत्कृष्ट आहे, असं माझं मत असून मला माझ्या निर्णयाचा आनंद वाटतो. या चित्रपटाद्वारे त्याने केवळ हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पणच केलं आहे, असं नव्हे, तर स्वत:च्या भावी कारकीर्दीचा मार्गही निश्चित केला आहे. ज्यांना चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहता आला नाही, अशा प्रेक्षकांना आता झी सिनेमा वाहिनीवरील त्याच्या जागतिक टीव्ही प्रीमिअरद्वारे तो पाहण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.”
तांत्रिक कौशल्य लाभलेल्या वासू (उत्कर्ष शर्मा) या प्रतिभावान तरूणाची ही कथा आहे. चित्रपटाचा प्रारंभ फ्लॅशबॅक पध्दतीने होतो. ज्यात कॉलेज कॅम्पसमध्ये वासू आणि नंदिनी (ईशिता चौहान) यांच्यात फुलणारे प्रेम दिसून येते. नंदिनीच्या प्रेमात पडलेल्या वासूवर ‘रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग (रॉ)’ या गुप्तचर संघटनेच्या एका हॅकिंगविरोधी मिशनचीही जबाबदारी असते. चित्रपट वर्तमानकाळात येतो तेव्हा वासू हा संपूर्ण काळ्या वेशात आणि हातात एक काठी घेऊन चालताना दिसतो. त्याला टिनायटसचा त्रास होत असतो. एका मिशनमध्ये अनेक गोळ्या लागूनही वाचलेला, पण त्यामुळे कायमचा जायबंदी झालेला वासू आता ‘रॉ’च्या एका विशेष शाखेचा प्रमुख बनलेला असतो. एमआरएस (नवाझुद्दिन सिद्दिकी) नावाच्या एका कुख्यात गुंडाचा माग काढण्याची जबाबदारी वासूवर असते, कारण त्याचा पूर्वी त्याच्याशी संबंध आलेला असतो. पिस्तुलात बुलेट मारण्याइतक्याच सहजतेने वैदिक मंत्रांचे पठण करणारा, मोटारींच्या ताफ्याचा सायकलवरून पाठलाग करणारा आणि विक्रमी वेळेत रुबिक क्यूबचे कोडे सोडविणारा वासू ज्या मिशनवर असतो, त्यात भरपूर अॅक्शन प्रसंग आणि नाट्यमय थरार ठासून भरलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट पहताना प्रेक्षक आपल्या खुर्चीला खिळून बसतील.आपल्या पदार्पणातील चित्रपटातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणाऱ्या उत्कर्ष शर्माला रविवार, 18 नोव्हेंबर रोजी रात्री 9.00 वाजता पाहा ‘जीनिअस’मध्ये फक्त ‘झी सिनेमा’वर!
Leave a Reply