
कोल्हापूर: गेल्याच आठवड्यातील तीन दिवसांच्या कोल्हापूर दौर्यानंतर पुन्हा एकदा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापुर दौर्यावर आले आहेत. प्रारंभी हॉटेल पंचशिल इथं त्यांचं आगमन झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शहर अध्यक्ष आर के पोवार, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, संगीता खाडे, जहिदा मुजावर, अनिल साळोखे यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. जिल्हयातील सर्व पक्ष पदाधिकार्यांनी खासदार महाडिक यांचंही संसदीय उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान शरद पवार यांचं, खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी आगमन झालं. खासदार धनंजय महाडिक यांनी पुष्पगुच्छ देवून पवार यांचं स्वागत केलं आणि आभारही मानले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संसदीय उपनेते म्हणून नुकतीच खासदार महाडिक यांची नियुक्ती झालीय. त्याबद्दलचं पत्र शरद पवार यांनी, लोकसभा अध्यक्षांकडं सुपूर्द केलं. त्यानंतर लगेचच शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा ठरला आणि आज त्यांनी खासदार महाडिक यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेतलं. शरद पवार यांनी, मोठ्या विश्वासानं संसदीय उपनेते पद दिल्याबद्दल आणि जबाबदारी टाकल्याबद्दल, धनंजय महाडिक यांनी पवार यांचे आभार मानले. या ठिकाणी खासदार महाडिक परिवाराच्या वतीनं पवार यांचं शाल, पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आलं. यानंतर स्नेहभोजन करून शरद पवार यांनी प्रासारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, पार्थ पवार, योगींद्र पवार, व्ही.बी. पाटील, आर के पोवार, ए वाय पाटील, सौ. अरूंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, समीर शेठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply