
कोल्हापूर : लोकसभा मतदार संघाचे खासदार धनंजय महाडिक यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संसदीय उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज याबाबतची अधिकृत घोषणा केली. खासदार धनंजय महाडिक यांना पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी देऊन खासदार शरद पवार यांनी महाडिक यांच्या कर्तृत्वाचा आणि कोल्हापूरचाही सन्मान केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संसदीय नेतेपदी खासदार सुप्रिया सुळे असून, आता धनंजय महाडिक यांना संसदेतील पक्षाचं उपनेतेपद दिले आहे. त्याबद्दलचे औपचारिक पत्र खासदार शरद पवार यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे पाठवले आहे.
धनंजय महाडिक यांनी पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अल्पावधीत आपल्या अभ्यासपूर्ण आणि गतिमान कारभाराची छाप पाडली आहे. संसदेतील चर्चांमध्ये सहभाग घेऊन, स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. शिवाय मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळेच खासदार महाडिक यांना सलग २ वर्ष संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संसदीय उपनेतेपदाची जबाबदारी देऊन त्यांच्या कर्तृत्वाला पाठबळ दिले आहे.
Leave a Reply