किशोरवयीन मुलामुलींसाठी शाळांमध्ये संवाद मालिकेचे आयोजन

 

कोल्हापूर : भारतामध्ये प्रत्येक पाचवी व्यक्ती किशोरवयीन आहे. या वयातील मुलांचे वाढते प्रश्न लक्षात घेता किशोरवयीन आरोग्य शिक्षण ही सध्या काळाची गरज आहे. मुलांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे आहे. आणि त्यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे आहे .
आत्ताची सामाजिक परिस्थिती बघता पालक मुलांमधील कमी होत चाललेले संवाद, सोशल मिडियाचा अति आणि गैरवापर, लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या समस्या, लहान वयात होणारी नात्याची गुंतागुंत, त्यातून होणारा मानसिक त्रास हे सगळे प्रश्न वाढत जाताना दिसतात. या प्रश्नांसाठी मुलांशी अगदी मोकळा संवाद करणे आवश्यक आहे.
ही संवाद मालिका कोल्हापूर मध्ये घेऊन येत आहेत जुगाड समुपदेशन केंद्र शाहुपुरी कोल्हापूर व स्टेप अप फाउंडेशन पुणे. दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरमधील शाळांमधून ‘We Wake’ हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती जुगाड संस्थेच्या व्यवस्थापिका डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या प्रकल्पांतर्गत ‘जुगाड’ संस्थेचे प्रशिक्षित समुपदेशक मुलांशी ‘किशोरवयीन आरोग्य शिक्षण’ या विषयावर संवाद साधतील. या प्रकल्पाची सुरुवात श्रीमती पल्लवी कोरगावकर यांच्या पुढाकाराने “आंतरभारती शिक्षण मंडळ संचालित” कोरगावकर हायस्कुल या शाळेपासून होत आहे.
हा प्रकल्प जास्तीतजास्त मुलांपर्यंत पोचवण्याचा आमचा मानस आहे .त्यासाठी सर्व शिक्षणसंस्था आणि कोल्हापूरवासीयांचा सहभाग व समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे.असे यावेळी आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेस स्टेप अप फाऊंडेशनच्या गौरी वैध तसेच प्रशिक्षित समुपदेशक गीता हसुरकर,सुरेश खांडेकर,अमरसिंह रजपूत,शिल्पा देगांवकर,सुखदा आठले,सीमा कवठेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!