
कोल्हापूर : मानवाने आपल्या भौतिक सुखासाठी जंगलांची बेसुमार केलेली कत्तल, त्याचबरोबर उद्योगधंदे वाढले, डोंगर पोखरले, सर्वत्र सिमेंटचे जंगले झाली. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे आणि पर्यावरण संवर्धनाचे मोठे आव्हान आज मानवासमोर उभे आहे. यावरच उपाययोजना करण्यासाठी पर्यावरणाचे महत्त्व जाणून पर्यावरणस्नेही जीवनशैली जगली पाहिजे. वापर आणि पुनर्वापर या तत्त्वानुसार नैसर्गिक साधनांपासून उत्पादित उत्पादनांचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी देशी गोमूत्र आणि शेण यापासून वैदिक प्लास्टरची निर्मिती करण्यात आली आहे. कोल्हापुरातील ‘टोटल ग्रीन सर्व्हिसेस’च्या माध्यमातून बांधकामासाठी उपयुक्त हे प्लास्टर बनवण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. शिवदर्शन मलिक आणि अमोल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, सिमेंट म्हणजे जोडणे व प्लास्टर म्हणजे लिंपणे. सिमेंट हे मानवी आरोग्याला हानीकारक आहे. तसेच यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. सिमेंट योग्य पद्धतीने वापरण्यासाठी त्याला 28 दिवस पाण्याची गरज लागते. पण वैदिक प्लास्टर कमीत कमी पाण्यात योग्य काम करते. भिंतीला योग्य पद्धतीने बांधून ठेवते. यामुळे हजारो लिटर पाण्याची बचत होते. गाईचे शेण, गोमूत्र हे उष्णतारोधी आहे. यामुळे आपले घर गर्मीत थंड व थंडीत गरम राहते. त्यामुळे पर्यायाने विजेचीही बचत होते. वैदिक प्लास्टर हे किरणोत्सारी रोधक आहे. यामुळे कोणत्याही रेडिएशनपासून वाचवते, आरोग्यासाठी पूरक आहे, हानीकारक जीवाणू व किटाणूपासून मुक्ती मिळते. केमिकलयुक्त प्लास्टरमुळे होणारे घरातील प्रदूषण, सिमेंट व वाळू यापासून कायमची मुक्तता करण्यासाठी शेण व गोमूत्र यापासून बनलेले वैदिक प्लास्टर हे गाईंना पुन्हा अर्थव्यवस्थेला जोडून त्यांना वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. तसेच गाईच्या शेणाचा वापर यासाठी करतात यामुळे आम्ही आपोआपच स्वच्छ भारत अभियानाशी जोडले गेलो आहोत असेही अमोल जाधव यांनी सांगितले. यासाठी पुन्हा शंभर वर्षांपूर्वीची आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी अशाच पर्यावरणपूरक वैदिक प्लास्टरचा वापर करणेच योग्य आहे.पत्रकार परिषदेला किरण माने, तानाजी पिंगळे, संजय कुडाळकर, संदीप माळी आदी उपस्थित होते.
Nice sir mla add hawa ahhe bhetaiche mla vaprayche aahe sir