
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सुरू असलेल्या नियोजनबध्द प्रयत्नांना यश मिळत आहे. त्यामुळेच कोल्हापूर रेल्वे स्थानकावर कोटयावधी रूपयांची कामे सुरू आहेत. त्याच बरोबरीनं इथल्या रेल्वे स्थानकाची क्षमता वाढविण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म बांधणीची मागणी होत होती. त्यानूसार खासदार महाडिक यांनी 7 सप्टेंबर 2018 रोजी पुणे इथं रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, विभागीय महाव्यवस्थापक मिलींद देऊसकर, कृष्णात पाटील यांच्या उपस्थित रेल्वे प्रशासनाची बैठक घेऊन सध्याच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी, तसंच नवीन प्लॅटफॉर्मची बांधणी केली जावी, अशी सूचना केली. त्याची गरज आणि उपयुक्तता समजावून सांगितल्यानंतर त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर या दोन्ही मागण्या मान्य झाल्या असून आज त्याबाबतचा निर्णय मंजूर करण्यात आला. त्यासाठी 8.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, येत्या 6 महिन्यात ही कामं पूर्ण होणार आहेत. रेल्वे स्थानकावर 4 प्लॅटफॉर्म कार्यान्वित होणार आहेत. 24 डब्यांची रेल्वेगाडीसाठी उपयुक्त असलेल्या नवीन प्लॅटफॉर्म बांधणीचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. सध्या 12 डब्यांची लांबी असलेल्या प्लॅटफॉर्मची लांबी आणखी वाढवली जाणार आहे. दरम्यान कोल्हापुरातून मुंबईसाठी आठवड्यातून 3 अतिरिक्त फेर्यांसाठी नवीन गाडी सुरु करण्याची मागणी केली असून लवकरच त्याला हिरवा कंदिल मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
Leave a Reply