
कोल्हापूर : अपघाताने पॅराप्लेजिक बनावे लागले असले तरी समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरून स्वतंत्रपणे राहात स्वावलंबी बनून स्वत:ला लेखक व पत्रकार म्हणून सिद्ध करणार्या सोनाली प्रकाश नवांगुळ यांचा नुकताच मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात ‘स्ट्राइड 2018’ या एमबीए फौंडेशन व सेल्फ एस्टिम फौंडेशन फॉर डिसेबल या संस्थांच्या वतीने ‘साऊथ इंडियन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांच्या हस्ते आणि एमबीए फौंडेशनच्या अध्यक्षा मिनाक्षी बालसुब्रह्मण्यम यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह, गौरवपत्र व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील हजारो अपंगांसाठी प्रेरणादायी जीवन जगणार्या आणि अपंगांच्या विविध समस्यांना लेखणी व वाणीद्वारे समाजापर्यंत पोहचवून समाजाला अपंगांशी मैत्रीपूर्ण पर्यावरण निर्माण करण्यासाठी आवाहन करणार्या सोनाली नवांगुळ यांच्या मुंबईत झालेल्या या सत्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्याबरोबरच मुंबईतील कार्यक्रमात महिलांच्या सशक्तीकरणासाठी आयोजित केलेली मॅराथॉन पूर्ण करणार्या अपंग महिला जयश्री शिंदे, पहिल्या ‘मिस व्हिलचेअर’ निनू केसवानी तसेच शारदा जितकर, अखिल बी. श्रीराम व केतना मेहता यांचाही कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
अपंग व्यक्तींना आत्मविश्वास आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एमबीए फौंडेशेन व सेल्फ एस्टिम फौंडेशन फॉर डिसेबल या संस्थांच्या वतीने दर वर्षी अन्य उपक्रमांबरोबरच अनोखा फॅशन शो आयोजित करण्यात येतो. या फॅशन शो मध्ये अपंग व्यक्तींबरोबरच अनेक सेलिब्रेटी आणि मॉडेल्स रॅम्पवॉक करतात. अपंग व्यक्तींसाठीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डिझायनर्स कपड्यांचे डिझाईन्स बनवत असतात. यावर्षी ‘स्ट्राइड 2018 वॉक डिग्निटी’ या कार्यक्रमात स्मिता गोंदकर, डॉ. शर्मिला नायक, गौतम प्रियंक, गुरप्रित चड्डा, अभिनेत्री मिताली नाग आदी सेलिब्रेटी व मॉडेल्स अपंग व्यक्तींसमवेत रॅम्पवर उतरल्या होत्या. अपंग व्यक्तींनी यावेळी गायन, नृत्य, नाटक यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना डॉ. शंकर यांनी अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता यावे यासाठी सामाजिक सहसंवेदना जागी करणारे उपक्रम सातत्याने होण्याची गरज प्रतिपादन केली, तर मिनाक्षी बालसुब्रह्मण्यम यांनी स्ट्राइड 2018 सारखे उपक्रम अपंग व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढीला लागावा यासाठी राबविले जात असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, ‘आपल्या अपंगत्वासह समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन आपला ठसा समाजाच्या मुख्य प्रवाहावरही उमटवणार्या व्यक्तींचा सत्कार हादेखील आम्ही त्यासाठीच करीत आहोत.’
Leave a Reply